पारनेर | नगर सह्याद्री
महामार्गावर वाहनांच्या प्रतिक्षेत असलेल्या महिला हेरून त्यांना लिफ्ट देण्याचा बहाणा करून वाहनात बसवायचे पुढे गेल्यावर निर्मनुष्य ठिकाणी कार थांबवून कारमध्ये बसविण्यात आलेल्या महिलेस धमकावत, मारहाण करीत त्यांच्याकडील दागिने, पैसे बळजबरीने हिसकाऊन घेत त्यांना कारच्या खाली उतरवून धुम ठोकणाऱ्या टोळीला ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे नगर-कल्याण महामार्गावर अटक करण्यात आली आहे.
नागेश उर्फ उमेश बापू खडतरे (रा. झारेवाडी, ता. मंगळवेढा, जिल्हा सोलापूर) लक्ष्मी नागेश उर्फ उमेश खडतरे (रा. मल्लीकार्जुन नगर, सोलापूर) दीपा सचिन पवार (रा. मोहळ जि. सोलापूर) व एक अल्पवयीन मुलगी यांचा या आरोपींमध्ये समावेश आहे. ही टोळी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर इतर पोलीस ठाण्यातही गुन्हे दाखल आहेत.
10 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास मालन कोंडीबा जाधव वय (65 रा. वडनेर हवेली, ता. पारनेर) या ढोकी शिवारातील एस. के. हॉटेलजवळ वाहनाची प्रतिक्षा करत होत्या. नेहमीप्रमाणे या टोळीने या आजना हेरले आणि त्यांच्याजवळ ती कार येऊन थांबली. पुरुष कार चालवत होता तर दोन महिला व एक लहान मुलगी कारमध्ये होती. दोघींपैकी एका महिलेने आजी कुठे जायचे आहे अशी विचारणा करत कारमध्ये बसा आम्ही तुम्हाला सोडतो असे सांगत आजना कारमध्ये बसण्यास भाग पाडले.
नेहमीप्रमाणे कार पुढे गेल्यानंतर पेट्रोल संपल्याचा बहाणा करून कार थांबविण्यात आली. त्यानंतर मालन जाधव यांना दमदाटी करून, मारहाण करून त्यांच्याकडील रोख रक्कम व सोन्याचे दागिने हिसाकावून घेत कारखाली उतरवून देण्यात आले. दागिने लुटल्यानंतर मालन जाधव या आजनी ढोकी टोल नाक्यावर कामाला असलेल्या आपल्या नातवाला फोन करून झालेल्या घटनेची माहीती दिली. मात्र तोपर्यंत आरोपींची कार टोलनाका ओलांडून भरधाव वेगाने निघून गेली होती.
आजच्या नातवाने टोलनाक्यापुढील गावांमध्ये आपल्या मित्रांना फोन करून कारचे वर्णन सांगून घडलेल्या घटनेची माहीती दिली. पुढे अनेक गाड्यांचा ताफा त्या कारचा शोध घेऊ लागला. ती का कार वासुंदे चौकात आल्याचे लक्षात आल्यानंतर चौकामध्ये ही कार आडविण्यात आली. तात्काळ तिथे मोठा जमाव जमा झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक समीर बारवकर, उपनिरीक्षक रणजीत मारग यांच्या पथकाने धाव घेत टोळीस ताब्यात घेतले.