अव्वल कारकून चार लाखांच्या लाचेच्या जाळ्यात
अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- रस्त्याच्या कामाची तांत्रिक मान्यता देण्यासाठी चार लाख रुपये लाच स्वीकारताना पारनेर तालुक्यातील अव्वल कारकून सुनील बाबूराव फापाळे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याची घटना घडली.
या संदर्भात तक्रारदाराच्या गावातील 11 रस्ता काँक्रिटीकरण कामाचा ग्रामसभेत ठराव मंजूर करण्यात आला होता. या कामाचे ठराव कागदपत्रांसाह तहसीलदार तथा गट कार्यक्रम अधिकारी (मग्रारोहयो) पारनेर यांना सादर केले होते. त्यानंतर पारनेर तहसीलदारांनी या कामाचे अंदाजपत्रक तयार करून व तांत्रिक मान्यता देण्याकारिता उपअभियंता, जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम उपविभाग, पारनेर यांना पत्र दिले होते. त्यावरून उपअभियंत्यांनी या कामाचे अंदाजपत्रक तयार करून व तांत्रिक मान्यता देऊन प्रशासकीय मान्यता करिता पारनेरच्या तहसीलदारांना सादर केले होते.
11 कामांची प्रशासकीय मान्यता देण्याकरिता या कामाच्या अंदाजपत्रकीय रकमेच्या तीन टक्क्यांप्रमाणे लाच मागणी केल्याबाबतची तक्रार तक्रारदाराकडून 15 ऑक्टोबर 2024 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अहिल्यानगर येथे प्राप्त झाली होती. त्यानुसार 15 ऑक्टोबर 2024 रोजी लाच मागणी पडताळणी करण्यात आली. लाच मागणी पडताळणी कारवाई दरम्यान आलोसे अव्वल कारकून सुनील बाबुराव फापाळे याने पंचासमक्ष कामाच्या अंदाजपत्रकीय रकमेच्या दोन टक्के स्वतःकरिता व तहसीलदारांकरिता पाच लाख 50 हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती चार लाख रुपये लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली. म्हणून फापाळे याच्याविरुद्ध पारनेर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या सापळा पथकात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोहेकॉ संतोष शिंदे, मपोहेकॉ राधा खेमनर, पोना चंद्रकांत काळे, पोलिस अंमलदार रवींद्र निमसे, बाबासाहेब कराड, चापोहेकॉ हारून शेख आदींचा समावेश होता. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली घालण्यात आला.