अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
महानगरपालिकेने जानेवारी महिन्यापासून तीन टप्प्यात दिलेल्या शास्ती माफी योजनेमध्ये शहरातील 16722 मालमत्ता धारकांनी 8 कोटी 88 लाखांची सवलत घेऊन 17.16 कोटींचा कर जमा केला आहे. शास्तीमध्ये 50 टक्के सवलत घेण्यासाठी अखेरचे सात दिवस शिल्लक राहिले आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी वसुली कार्यालये व भरणा केंद्र 31 मार्चपर्यंत सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी सवलतीचा लाभ घेऊन तत्काळ थकीत कराचा भरणा करावा अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिला आहे.
महानगरपालिकेने 8 जानेवारी ते 21 फेब्रुवारी या कालावधीत 100 टक्के शास्ती माफ केली होती. तर, 22 ते 28 फेब्रुवारी या कालावधीत 75 टक्के सवलत देण्यात आली होती. मार्च अखेरपर्यंत शास्तीमध्ये 50 टक्के सवलत दिली जात आहे. सवलत काळात थकबाकीदार करदात्यांनी 8.88 कोटींची सवलत घेऊन 17.16 कोटींचा कर जमा केला आहे. त्यामुळे एकूण थकबाकीपैकी 26.07 कोटींची वसुली झाली आहे.
चालू आर्थिक वर्षात सुमारे 77 कोटींची वसुली झाली आहे. अखेरच्या सात दिवसांत अधिकाधिक वसुली करण्यात येणार आहे. त्यासाठी थकबाकीदारांवर कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांना अद्यापही 50 टक्के सवलत घेण्याची संधी आहे. ही अखेरची संधी असून या नंतर शास्तीमध्ये सवलत दिली जाणार नाही. त्यामुळे नागरिकांनी या सवलतीचा लाभ घेऊन तत्काळ थकीत कर भरावा. नागरिकांच्या सोयीसाठी शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी कर भरणा केंद्र सुरू राहणार आहेत. कर न भरल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.