Politics News: विधानसभेचे बिगुल वाजणार असून सर्वच पक्षानीनिवडणुकीसाठी कंबर कसली आहे. महायुतीमध्ये जागा वाटपावरुन रस्सीखेच सुरू आहे. विधानसभेच्या जागांसाठी शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भारतीय जनता पक्षामध्ये कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान महायुतीतील पक्षांमध्ये शाब्दिक बाचाबाची सुरु आहे. या वादाची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
यावर राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांनी भाष्य केलं आहे. ज्येष्ठ मंडळी, आमचे कारभारी यांनी या लोकांना अशा कॉमेंटपासून थांबवलं पाहिजे. नंतर त्यावर बोलता येईल. त्या विधानाशी आमचा संबंध नाही, असे होऊ शकत नाही. आपसात भांडणाचा फायदा विरोधी पक्ष घेणार आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन सूचना द्यायला हवं. सर्वांनी आपआपल्या भागात लक्ष द्यायला हवं, असं भुजबळ म्हणालेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर असणार छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उग्घाटनानंतर केवळ आठच महिन्यात कोसळला. त्यावरही छगन भुजबळांनी भाष्य केलं आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माफी मागितली आहे. पुतळा लावण्याचं काम नौदलाने केलं आहे. हे खातं केंद्रात अख्त्यारित येतं. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली आहे. अजून काय करावं? त्यांची चूक झाली त्यांनी मान्य केली. आता अजून काय करायला हवं? हे विरोधकांनी सांगावं. ज्यांनी लक्ष दिलं नाही त्यांच्यावर कारवाई केली जात आहे, असंही छगन भुजबळ म्हणाले.