अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
तारकपुर परिसरातील हॉटेल सिंग रेसिडेन्सीच्या रूम नं. 201 मध्ये ऑनलाइन क्रिकेट आणि शेअर मार्केट सट्टेबाजीचा प्रकार उघडकीस आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ बिरप्पा सिध्दप्पा करमल यांनी मधुकर सखाराम येवले (रा. मुलुंड कॉलनी, मुंबई) आणि त्याच्या अज्ञात साथीदाराविरुद्ध तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र जुगार कायदा 4, 5 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
दिनांक 4 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 6:44 वाजता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकला. मधुकर येवले याने बनावट आधार कार्ड (नरसैया मोरप्पा नरसिमा) वापरून हॉटेल रूम बुक केल्याचे उघड झाले. त्याच्याकडून ओप्पो अँड्रॉइड फोन (किंमत 15 हजार रुपये), दोन किपॅड फोन, कॅल्कुलेटर, वही (बुकींची नावे, आयडी, पासवर्डसह) आणि दोन बनावट आधार कार्ड जप्त करण्यात आले.
पंच कादर मुसा शेख आणि कय्युम अजगरअली सय्यद यांच्या उपस्थितीत तपासणी केली असता, येवले याने व्हॉट्सॲपद्वारे ओम (आनंद), पिंटू (अंधेरी), वाजू भाई, संतोष मारू आदी बुकींकडून आयडी आणि पासवर्ड घेऊन पाकिस्तान-वेस्ट इंडीज 20-20 मॅच आणि शेअर मार्केटवर सट्टा खेळत असल्याचे कबूल केले. तपास पोउपनि राजेंद्र वाघ करीत असून, बनावट कागदपत्रे आणि सिमकार्ड वापरून फसवणूक केल्याप्रकरणीही कारवाई सुरू आहे.
फसवणूक प्रकरण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
नेप्ती मार्केट परिसरात कांदा खरेदीच्या नावाखाली व्यापारी राहुल रामदास आंधळे यांची 13 लाख 32 हजार 342 रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अमित अंकुश कापरे, त्याचा भाऊ गोरक्ष उर्फ बाबू अंकुश कापरे आणि प्रमोद गोकुळ जगताप या तिघांविरुद्ध अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल आंधळे (वय 31, रा. सावेडी, अहिल्यानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपींनी सामायिक हेतूने त्यांचा आणि त्यांच्या वडिलांचा विश्वास संपादन करून 14 मार्च 2020 ते 21 मार्च 2020 या कालावधीत नेप्ती मार्केट येथे ट्रान्सपोर्टद्वारे कांदा खरेदी केला. मात्र, याबदल्यात त्यांनी आंधळे यांना एकूण 13 लाख 32 हजार 342 रुपयांची रक्कम देण्यास टाळाटाळ केली. या फसवणुकीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे . या प्रकरणाचा तपास उप पोलीस निरीक्षक रविंद्र वसंतराव डावखर करीत असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई सुरू आहे.