बीड । नगर सहयाद्री:-
बीडच्या शिरूर तालुक्यात भाजप पदाधिकारी आणि आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्या भाई याच्या घरावर वनविभागाने मोठी कारवाई केली आहे. या धाडीत वन्यजीव शिकारीचे मोठे घबाड हाती लागले असून, धारदार शस्त्र, जाळ्या, वाघूर आणि प्राण्यांचे मांस जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
बावी गावातील डोंगर परिसरात मोठ्या प्रमाणावर हरणांचा कळप होता. मात्र, सतीश भोसले आणि त्याच्या टोळीने या हरणांची मोठ्या प्रमाणात शिकार केल्याचा आरोप वन्यजीवप्रेमींनी केला होता. हरणांना जाळ्यात अडकवून त्यांची शिकार केली जात असल्याने स्थानिकांनी याला विरोध केला होता. मात्र, जाळी लावण्यास मज्जाव करणाऱ्यांना मारहाण करण्यात आली होती. या आरोपांनंतर वनविभागाने मोठी कारवाई करत सतीश भोसलेच्या घरावर छापा टाकला. जिल्हा वन अधिकारी अमोल गरकळ यांच्या नेतृत्वाखाली 40 अधिकाऱ्यांच्या टीमने ही धाड टाकली.
यामध्ये वन्यजीव शिकारीसाठी वापरण्यात येणारे हत्यार, जाळ्या आणि प्राण्यांचे अवशेष सापडले. सतीश भोसले हा मागील काही वर्षांपासून राजकारणात सक्रिय असून, तो भाजपच्या महाराष्ट्र भटके विमुक्त आघाडीचा पदाधिकारी आहे. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणावर वन्यजीवप्रेमींनी संताप व्यक्त करत उशिरा कारवाई झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. आता पुढील तपास सुरू असून, वनविभागाने अधिक कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.