अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
शिंगवे नाईक (ता. अहिल्यानगर) शिवारात हनुमानवाडी येथे दोन गटांत वाद होऊन हाणामारी झाल्याची घटना रविवारी (13 एप्रिल) सकाळी घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादीवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दीपक मच्छिंद्र गुलदगड (वय 27 रा. शिंगवे नाईक) यांच्या फिर्यादीवरून अनिल नामदेव बोरूडे, प्रणव अनिल बोरूडे, वनिता अनिल बोरूडे (तिघे रा. शिंगवे नाईक) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी दीपक हे संशयित आरोपींच्या शेतात पेन्शन संदर्भात चर्चा करण्यासाठी गेले असता, त्यांनी दीपकला लाकडी दांडक्याने व चैनने मारहाण केली, तसेच शिवीगाळ व दमदाटी केली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
दुसर्या बाजूने, अनिल नामदेव बोरूडे (वय 48 रा. शिंगवे नाईक) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुनील नामदेव बोरूडे, मच्छिंद्र गबाजी गुलदगड, दीपक मच्छिंद्र गुलदगड, संगीता सुनील बोरूडे (सर्व रा. शिंगवे नाईक) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपींनी फिर्यादी अनिल यांच्यासोबत ग्रामपंचायत बैठकीला का आले नाही, यावरून वाद घालून त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. गुन्ह्याची नोंद केली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.