महाद्वार मिरवणूक । कुस्त्यांचा हागामा
पारनेर । नगर सहयाद्री:
पिंपळगाव रोठा येथील लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या स्वयंभू श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानात श्रावण मासानिमित्त रविवार, दिनांक १० ऑगस्ट २०२५ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी सकाळी ९ वाजता खंडोबा मंदिराच्या मुख्य महाद्वाराची भव्य मिरवणूक गावातून काढण्यात येणार आहे. कै. गेनभाऊ कोंडाजी भालेराव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ श्री. शांताराम गेनभाऊ भालेराव यांनी हा महाद्वार देवस्थानाच्या सेवेत अर्पण केला आहे.
रथातून निघणारी ही मिरवणूक येळकोट येळकोट जय मल्हार च्या जयघोषात, ढोल-ताशांच्या गजरात, पिंपळगाव रोठा गावातून मोठ्या थाटामाटात मार्गस्थ होणार असून, त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते नव्या महाद्वाराची स्थापना करण्यात येणार आहे. श्रावण मासाच्या पारंपरिक परंपरेनुसार, दुपारी १ वाजता कुस्त्यांची स्पर्धा भरविण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील नामवंत मल्ल आखाड्यात उतरणार असून, निकाली कुस्त्यांसाठी भरघोस बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे. कार्यक्रमानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान ट्रस्टने पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ, भाविक व कुस्तीप्रेमींना या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.