अहिल्यानगर । नगर सहयाद्री :-
एका युवकावर चार जणांनी धारदार शस्त्र व लाकडी दांडक्यांनी हल्ला करून मारहाण केल्याची घटना बुधवारी (2 एप्रिल) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सावेडी उपनगरात घडली. प्रवीण नितीन मोकाशी (वय 21, रा. वाणीनगर, मोकाशी वस्ती, सावेडी) असे जखमी युवकाचे नाव आहे. त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असून जबाबावरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोनू दत्तात्रय कोहक (रा. बोल्हेगाव), विकी बाळु ढवण (रा. ढवण वस्ती, सावेडी), प्रशांत शिवाजी निकरड (रा. भिटे चाळ, तागड वस्ती, सावेडी) आणि राकेश मते उर्फ स्वप्नील (रा. बरबडे वस्ती, पाईपलाईन रस्ता, सावेडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. प्रवीण हा सचिन पोटे यांच्या डीजे गोडावूनमध्ये हेल्पर म्हणून काम करत आहे. सदर गोडावून त्याच्या राहत्या घरा मागेच असल्यामुळे काम करून तो आपल्या दुचाकीवरून बुधवारी रात्री घरी परतत होता. या दरम्यान आरोह कॉलनीजवळ सोनू कोहक, विकी ढवण, प्रशांत निकरड आणि राकेश मते उर्फ स्वप्नील हे चौघेजण मोपेडवर येऊन थांबले.
यातील सोनू कोहक याने प्रवीणला धमकावत विचारले की, माझ्या मामाच्या मुलाला हात लावतोस का? तुझी विकेटच टाकतो, अशी धमकी दिली. यानंतर विकी ढवन याने लाकडी दांडक्याने, तर प्रशांत निकरड याने लोखंडी पाईपने मारहाण केली. राकेश मते याने लाथाबुक्यांनी मारहाण केली. प्रवीण पळून जाऊ लागला असताना त्याला दोन जणांनी पकडून ठेवले आणि सोनू कोहक याने त्याच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केला. या हल्ल्यात प्रवीणच्या डोक्यातून रक्तस्राव झाला. घटनास्थळी लोकांची गद जमल्याने संशयित आरोपी पळून गेले. अधिक तपास पोलीस अंमलदार गिरी करीत आहेत.