व्यावसायिकास लुटले | नऊ जणांवर गुन्हा
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
झेंडीगेट परिसरात लाकडी दांडके, कायते, बंदुकीचा वापर करुन तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार १४ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडला. यात स्क्रॅप व्यवसायी अबुताला अकिल शेख (वय २४, रा. इब्राहीम कॉलनी, जी.पी.ओ. चौक) गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अबुताला यांनी कोतवाली पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार नजिर अब्दुलरज्जाक जहागीरदार ऊर्फ नज्जु पहिलवान, इम्रान बशीर जहागीरदार, इम्तियाज जहागीरदार, रशिद अब्दुल जहागीरदार ऊर्फ रशिद दंडा, अकिब रशिद जहागीरदार, अश्रफ नदिम जहागीरदार, फैजान निसार जहागीरदार, जिशान इम्तियाज जहागीरदार (सर्व रा. झेंडीगेट) आणि मोईन आलम जहागीरदार (रा. फकीरवाडा) यांनी हल्ला केला. इम्रानकडे बंदूक, तर अकिब आणि अश्रफ यांच्याकडे कोयते होती. रशिद दंडा, इम्तियाज, फैजान, जिशान आणि मोईन यांनी लाकडी दांडयाने अबुताला यांना पाठीवर, हातावर आणि पायावर मारहाण केली.
नज्जु पहिलवानने इसको जानसे मार डालो असे ओरडत हल्ला चढवला.या हल्ल्यात अबुताला गंभीर जखमी होऊन खाली पडले. अकिबने त्यांची सोन्याची चैन हिसकावली आणि हमारे खिलाफ खडा हुआ तो जानसे मार देंगे अशी धमकी देऊन सर्वजण मोटारसायकलवरून पळाले. अबुताला यांचे काका फरमान नसिर शेख यांनी त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
कोतवाली पोलिसांनी नऊही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. शहरातील दंडा टोळीच्या वाढत्या गुंडगिरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.