अहमदनगर । नगर सहयाद्री:-
अहमदनगर शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. तोफखाना हद्दीत तीन ठिकाणी दिवसा घरफोडी करून सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केली. तसेच, कोतवाली हद्दीतील चार दिवसांपासून बंद असलेल्या घरात घुसून दागिने आणि रोकड चोरून नेली. या चार ठिकाणी घरफोडी करून चोरट्यांनी 10 लाख 80 हजारांचा ऐवज लांबविला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात 11 सप्टेंबर रोजी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
1. साईनगर बंगला:
बुरूडगाव रस्त्यावरील साईनगरमधील बंगला फोडून चोरट्यांनी सुमारे 10 तोळ्यांचे सोन्याचे दागिने, अर्धा किलो चांदीचे दागिने आणि चार लाख 60 हजार रुपयांची रोकड लंपास केली. 7 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता बंगल्यावर कुलूप लावून बंद केले गेले होते, आणि 11 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता चोरीची घटना उघडकीस आली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
2. धनलक्ष्मी रेसीडेन्सी
तपोवन रस्त्यावर समतानगर येथील धनलक्ष्मी रेसीडेन्सी मधील घर फोडून अज्ञात चोरट्यांनी एक लाखाची रोकड, सात तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि साडे सहा भाराचे चांदीचे दागिने चोरले. ही घटना 11 सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा ते दुपारी चार वाजेपर्यंत घडली.
3. मयुर कॉलनी
तपोवन रस्त्यावर मयुर कॉलनीतील व्यंकटेश अपार्टमेंट मधील दिपाली अविनाश दरंदले यांच्या घरातील 18 ग्रॅमचे सोन्याचे मिनी गंठण आणि चार हजार रुपयांची रोकड चोरून नेली. ही चोरी 11 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता घडली.
4. वर्षा मेडिकल
आडते बाजार येथील गौतम मनसुखलाल भंडारी यांच्या मेडिकल दुकानात चोरट्यांनी 50 हजारांची रोकड चोरून नेली. ही घटना 10 सप्टेंबर रोजी रात्री नऊ ते 11 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान घडली.