सुपा / नगर सह्याद्री:-
पारनेर तालुक्यातील भोयरे गांगर्डा येथील रसाळवाडी वर एकाच रात्रीत तीन घरे फोडल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस प्रशासनाने याचा तातडीने शोध घेऊन चोरांना अटक करावी व गस्त घालावी अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
बुधवार दि.२१ रोजी मध्यरात्री १:३० ते गुरूवार दि.२२ रोजी पहाटे ३ वाजेपर्यंत हा प्रकार घडला. यामध्ये एका वृद्ध महिलेस जबर मारहाण केली. यादरम्यान सारोळा रस्त्यालगत रहिवासी असलेल्या शोभा चंद्रकांत रसाळ यांच्या घराचा दरवाजा कटावणीच्या सहाय्याने उघडला व आत प्रवेश केला. यावेळी महिलेचे अंगावरील, कपाटातील दोन तोळे सोने व रोख रक्कम असा दोन लाखांचा ऐवज मारहाण करत हिसकावून घेतला.
त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा रसाळवाडी येथे वळवला.रसाळवाडी येथील सेवानिवृत्त शिक्षक प्रकाश मारूती रसाळ हे दोघे पती पत्नी घरात झोपले असताना चोरट्यांनी कटावणीच्या सहाय्याने घराचा दरवाजा उघडला, रसाळ पत्नी-पत्नी यांनी आरडाओरडा केल्यानंतर चोरट्यांनी तेथून पळ काढला.
यानंतर चोरट्यांनी मंदाबाई मल्हारराव रसाळ यांच्या घराचा दरवाजा देखील कटावणीच्या सहाय्याने उघडला व कपाट उघडून त्यातील नवीन साड्या एक लोखंडी पेटी यासह रोख रक्कम असा एक लाखाचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.
दरोडेखोरांचा शोध लावा; ग्रामस्थांची मागणी
दरोडेखोर अतिशय सराईत असून घरफोडी करताना धाक दाखवण्यासाठी व चोरी करण्यासाठी धारदार शस्त्रे कमरेला तलवार, सळई, कोयते, कटावणी असे वेगवेगळे हत्यारे वापरून चोरी करत आहे. सदर ठिकाणी राहणाऱ्या एकांकी घरावर पाळत राखून दरोडा टाकत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. अशा प्रकारच्या चोरीच्या पाच ते सहा घटना घडवून देखील सुपा पोलिसांना अद्याप पर्यंत दरोडेखोरांचा शोध लागलेला नाही. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी यात लक्ष घालून सुपा पोलीस स्टेशन हद्दीमधील वाढत्या दरोड्यावर आवर घालावा व दरोडेखोरांचा शोध लावण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.