अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
वैदुवाडी, सावेडी परिसरात कुत्रा पाळण्याच्या कारणावरून झालेल्या वादात दोन भावांना मारहाण झाल्याची घटना गुरूवारी (22 मे) घडली आहे. या प्रकरणी तिघांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी नवनाथ मच्छिंद्र शिंदे (वय 24, रा. लक्ष्मी माता मंदिराशेजारी, वैदुवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांनी कुत्रा पाळला आहे. त्याला शेजारच्या मोकळ्या जागेत पिंजऱ्यात ठेवले होते. यावेळी शेजारी राहणारा सचिन संतोष शिंदे याने हातातील लाकडी काठीने त्या कुत्र्याला मारहाण करण्यास सुरूवात केली.
याविरोधात नवनाथ व त्याचा भाऊ गोरख शिंदे यांनी विरोध केला असता, सचिनने रागाच्या भरात शिवीगाळ करत हातातील कोयत्यासारख्या वस्तूने नवनाथच्या कपाळावर वार केला. त्यातून दुखापत झाली. दरम्यान, नवनाथचा भाऊ गोरख यांनाही संतोष बाबू शिंदे याने लाकडी काठीने मारहाण करत जखमी केले. यावेळी ताई संतोष शिंदे हिने शिवीगाळ केली. तसेच, तुम्ही आमच्या नादाला लागू नका, नाहीतर जिवे मारून टाकीन, अशी धमकीही दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
घटनेनंतर जखमी नवनाथ व गोरख शिंदे यांनी तत्काळ पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी त्यांना रूग्णालयात उपचारासाठी पाठवले. त्यानंतर त्यांनी तिघांविरूध्द फिर्याद दिली. पोलिसांनी सचिन शिंदे, संतोष शिंदे व ताई शिंदे (तिघे रा. वैदुवाडी, सावेडी) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. महिला पोलीस अंमलदार संजीवनी नेटके तपास करीत आहेत.