अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
थोरल्या पवारांचा नातू म्हणून ओळख राहिलेल्या कर्जत- जामखेड मतदारसंघातील आमदार रोहित पवार यांची त्यांच्याच मतदारसंघात मोठी कोंडी करण्यात विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे हे कमालीचे यशस्वी ठरले. राज्याचे अख्खे मंत्रिमंडळ चोंडीत आले आणि या साऱ्यांनी राम शिंदे यांचे कौतुक केले. चोंडी ग्रामस्थांसह दोन्ही तालुक्यांतील शिंदे समर्थकांमध्ये कृतकृत्य झाल्याची भावना आज पाहण्यास मिळाली. विशेषत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खप्पा मज राम शिंदे यांच्यावर राहिली. आजच्या कार्यक्रमात ती पुन्हा एकदा साऱ्यांनाच पाहता आली.
राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळ, सचिवांसह सारे प्रशासन चोंडीत आणल्याने राम शिंदे यांनी रोहित पवार यांची चोंडीत कोंडीच केली अशी उपरोधिक चर्चा आज दिवसभर रंगली! राज्याची राजधानी मुंबईत होणारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पहिल्यांदाच अहिल्यानगरच्या चोंडी येथे पार पडली. यापूव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठका या नाशिक, संभाजीनगर या जिल्ह्याच्या ठिकाणी झालेल्या आहेत. नारायण राणे मुख्यमंत्री होते तेव्हा रत्नागिरीलाही राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली होती. मात्र आजची राज्य मंत्रिमंडळाची बैठक ही विशेष ठरली. त्याचं कारणही तसंच ठरले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळाची बैठक ही राष्ट्रवादी काँग्रेस पाट (शरदचंद्र पवार) पक्षाचे विद्यमान आमदार रोहित पवार यांच्या कर्जत-जामखेड मतदार संघात झाली. विद्यमान विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्या पुढाकाराने आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं.
पुण्यलोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी दिनानिमित्त आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठ्या निर्णयांची घोषणा करण्यात आली. अहिल्यानगर येथील राम शिंदे-रोहित पवार संघर्ष पाहता जामखेड एमआयडीसी संदर्भातही या बैठकीत चर्चा झाली. मात्र, त्याचे श्रेय राम शिंदे यांनाच मिळाले. एकंदरीतच आज मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सर्व मंत्री, राज्यमंत्री आणि सचिव स्तरावरील सर्व अधिकारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी लवाजम्यासहित चोंडीत दाखल झाले होते. आजच्या या ऐतिहासिक राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रशासनाचा संपूर्ण फौजफाटा तैनात होता. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनानंतर पंकजा मुंडे यांनी सर्वप्रथम याच चोंडी येथे सार्वजनिक सभा घेतलेली होती. त्या सभेला भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी आपलं सर्व कसब पणाला लावून राज्य मंत्रिमंडळाची बैठक रोहित पवार आमदार असलेल्या मतदारसंघात घेऊन एक प्रकारे रोहित पवारांना सेटबॅक दिल्याची चर्चा रंगत आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज राम शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटनही झाले. विधानसभेच्या दोन्ही निवडणुकीत पराभव पत्कारावा लागल्यानंतरही राम शिंदे यांचे राजकीय वजन कमी होण्याऐवजी वाढलेलेच दिसले. रोहित पवार यांच्या मतदारसंघात सर्व मंत्रिमंडळ आलेले असतानाही त्यांना बाजूलाच राहावे लागले. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री संजय शिरसाट, मंत्री अतुल सावे, मंत्री संजय सावकारे, मंत्री भरत गोगावले, आमदार सुरेश धस, आमदार गोपीचंद पडळकर, नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी डॉ. पकंज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आदी उपस्थित होते.
रामभाऊ नव्हे, सभापती महोदय!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास मजतील एकमेव म्हणून नगरमधून राम शिंदे यांना ओळखले जाते. राज्यातही तीच ओळख! यापूर्वी देवेंद्र फडणवीस नगरमध्ये आले किंवा राज्यातील कोणत्याही कार्यक्रमात त्यांच्याकडून राम शिंदे यांचा नामोल्लेख ‘रामभाऊ’ असाच केला गेला. रामभाऊ काळजी करू नका, देवेंद्र तुमच्या पाठीशी आहे असे ते ठणकावून जाहीरपणे सांगत आले. आजचा दिवस त्याला अपवाद ठरला! देवेंद्र फडणवीस यांना आज त्यांच्या भाषणात राम शिंदे यांचा नामोल्लेख नेहमीप्रमाणे ‘रामभाऊ’ असा न करता ‘सभापती महोदय’, असा करताच व्यासपीठासह साऱ्यांनाच सुखद धक्का बसला. राम शिंदे यांनी यावर स्मितहास्य करत फडणवीस यांच्याकडे पाहत नम्रपणे हात जोडले! दोघांमधील मैत्री आणि त्यांच्यातील आठवणींना आज पुन्हा एकदा उजाळा मिळाला.
धनगरी परंपरेने स्वागत
चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती लाभली. यावेळी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी मंत्र्यांचे स्वागत खास धनगर समाजाची परंपरा असलेल्या काठी, घोंगडे, अहिल्यादेवी होळकर गौरवगाथा लोकमातेची हे पुस्तक, अहिल्यादेवी होळकर यांची मूत, शाल देऊन केले.
सूतगिरणी प्रकल्पाचे भूमिपूजन
महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागांतर्गत उभारण्यात येणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूतगिरणी मर्यादित या 80 कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. राज्याच्या ग्रामीण आणि शेतकरी भागातील आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या या सूतगिरणी प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराची मोठी संधी मिळणार आहे.
‘जर्मन हँगर’ चा भव्य दिव्य शामियाना
265 फूट लांब आणि 132 फूट रुंद आकाराचा ‘जर्मन हँगर’ प्रकारचा मंडप उभारण्यात आला होता. यात विविध वातानुकूलित कक्ष निर्माण करण्यात आले होते. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसाठी ग्रीन रूम, भेटीसाठी येणारे आमदार-खासदार, तसेच वरिष्ठ अधिकारी यांच्यासाठी कक्ष, मुख्य सचिवांचे कार्यालय, मंत्री परिषद सभागृह, स्वयंपाकघर, भोजन, पत्रकार कक्ष, सुरक्षा व वाहनचालक यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष, भोजन व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
चोंडीत कडेकोट सुरक्षा
ग्रामीण भागात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकसाठी चोंंडीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे दोन दिवसांपासून येथे तळ ठोकून होते. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या नेतृत्वाखाली सुमारे एक हजारापेक्षा अधिक अधिकारी व कर्मचारी दोन दिवसांपासून तैनात करण्यात आले होते.
कांस्य थाळीत शाही भोजन
मंत्रिमंडळ बैठक कक्षाशेजारी भोजन कक्ष उभारण्यात आला होता. भोजनामध्ये पुरणपोळी त्यावर गावरान तुप, आमरस, शिपी आमटी, ताक, मासवडी, कोथिंबीर वडी, कांदा भजी, खारे वांगे, वांगे भरीत, हुलगे उसळ, हिरव्या मिरच्याचा ठेचा, ज्वारी व बाजरी भाकरी, अशा एकूण 18 खाद्यपदार्थांचा आस्वाद मंत्र्यांनी घेतला. मंत्र्यांना हे भोजन कास्य धातूच्या ताटात वाढण्यात आले होते. स्थानिक पद्धतीप्रमाणे शिपी आमटी तयार करण्याची जबाबदारी स्थानिक महिलांवर सोपविण्यात आली होती.
चोंडी ते निमगाव डाकू रस्त्याचे भूमिपूजन
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत चोंडी ते निमगाव डाकू रस्त्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत चोंडी ते निमगाव डाकू दरम्यानचा 2.700 किलोमीटर लांबीचा रस्ता साकारण्यात येणार आहे. या कामासाठी राज्य शासनाने तीन कोटी 94 लाख रुपयांच्या खर्चास मान्यता दिली आहे. हे काम महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून हाती घेण्यात येणार आहे.