spot_img
अहमदनगरएक दिवसाचं ‘मिच्छामी दुक्कडम्’ अन् ‘वर्षभर घोडे!’

एक दिवसाचं ‘मिच्छामी दुक्कडम्’ अन् ‘वर्षभर घोडे!’

spot_img
नेत्यांचा टांगा पलटी होताच मास्तरांची सभा शांततेत! कौतुक करणारे विरोधक लाथा घालताना दिसल्यास आश्चर्य नको!
मोरया रे | शिवाजी शिर्के
महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे आणि नगर शहराचे पोलिस उपअधीक्षक अमोल भारती यांना सावध करण्याचा इशारा देणार्‍या बाप्पाची काल रविवारी दिवसभर वाट पाहिली. मात्र, बाप्पा आलाच नाही! संकटमोचक राहिलेला बाप्पा माझ्याच दोन मित्रांबाबत बोलत राहिला आणि सावधानतेचा इशारा देत शनिवारी निघून गेला. पुन्हा भेटू असं म्हणूनही तो रविवारी आलाच नाही. मात्र, आज भल्या पहाटेच त्याने मला झोपेतून उठवलं! 
मी- कोण आहे…. (अर्धवट झोपेतच मी पुटपुटलो.)
श्रीगणेशा- अरे…. रविवारची सुट्टी जास्तच एन्जाय केलेली दिसतेय!
(आवाजावरुन मी ताडलं! बाप्पाच आहे. उठून बसलो.)
मी- बाप्पा, अरे पहाटेचे पाच वाजलेत! इतक्या सकाळीच! अन् काल कुठे गायब झाला होतास?
श्रीगणेशा- स्वागताच्या निमित्ताने कर्णकर्कश डीजे, गाण्यांचे ठेके आणि ढोलताशे यातून माझ्या हृदयाचे ठोके वाढले रे! कान बहिरे झाले! त्यातच काल संवत्सरी! क्षमापना दिवस! मिच्छामी दुक्कडम्! वर्षभर चुका करायच्या! मन दुखवायची अन् संवत्सरीच्या निमित्ताने ‘मिच्छामी दुगडम्’ बोलून मोकळं व्हायचं! एक दिवस माफी मागायची अन् मग ३६४ दिवस घोडे लावायला मोकळं व्हायचं! काय कामाचं ते मिच्छामी दुगडम्! जैन धर्म अत्यंत चांगली शिकवण देत आलाय! पवित्र पर्युषण आणि संवत्सरीच्या निमित्ताने माफीनामा मागण्याचं अत्यंत चांगलं काम केलं जातं. हे करताना तुमच्याकडून नकळत, अनवधानाने, जाणूनबुजून काही कटू बोललेच जाणार नाही याची काळजी आपण घेणार आहोत की नाही! दरवर्षी माफी मागायची, मिच्छामी दुक्कडम्, असं आर्जव करायचं आणि दुसर्‍या दिवशी पुन्हा दुसर्‍याचं मन दुखावेल असं बोलायचंच कशाला! हात जोडून माफी मागणार्‍या पोस्ट काल सोशल मिडियावर दिवसभर मी पहात होतो. आपण चुकाच का करतो? अजानतेपणाने मन दुखावले जात असेलही! मात्र, दरवर्षी याच अनुषंगाने माफी मागताना आपण चुकतोय याची जाणीव का होत नाही?
मी- बाप्पा, जैन धर्मात हे पवित्र समजलं जातं आणि जैन धर्मगुरुंनी घालून दिलेल्या शिकवणीनुसार हे सारं होतं! त्यात गैर काहीच नाही.
श्रीगणेशा- माझा त्याला आक्षेपच नाही! पण, त्यातून आपण सारेच काही बोध घेणार आहोत की नाही?
मी- बाप्पा, मनोभावे सारे तुझ्या भक्तीत तल्लीन झालेत! तुझ्या नामाचा जयजयकार करत आहेत आणि सर्वत्र प्रसन्नतेचे वातावरण तयार झाले आहे. अबालवृद्धांमध्ये उत्साह संचारणार्‍या तुझ्या उत्सवात सारे तल्लीन झालेत आणि तू उपदेशाचे ढोस पाजत बसलाय! कौतुकाचा चकार शब्द बोलायला तयार नाहीस!
श्रीगणेशा- कौतुक! होय नक्कीच! अरे मास्तरांच्या बँकेची सभा काल झाली ना!
मी- होय बाप्पा, आमच्या जिल्ह्यातील शिक्षक अत्यंत गुणवान आहेत! त्यांनी अनेक पिढ्या घडवल्या! राज्यात आणि केंद्रात याच शिक्षकांनी घडवलेले अनेकजण आज चांगले आदर्शवत अधिकारी काम करताना दिसत आहेत!
श्रीगणेशा- हो… हो! कौतुक पुरे हा! यांची पण वकिली नको करु हा!
मी- बाप्पा काय रे! शंका का घेतोय माझ्या भूमिकेबद्दल?
श्रीगणेशा- अरे शंका नाही घेत मी! काल मास्तरांच्या बँकेची सर्वसाधारण सभा चालू असताना एका कोपर्‍यात बसून मी सारे पाहत होतो. हवं तर त्या सभेचा मी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार समज! पहिल्यांदाच असं घडलं की, गुरुजींनी गोंधळ घातलाच नाही! अरे कसा घालतील गोंधळ! ज्यांच्या विरोधात ओरडायचं त्यांनी त्यांच्या नेत्यालाच हुसकावलेलं! मग, विरोधकांनी उलटं केलं! नेत्याला सोडून बँकेचे संचालक एकत्र आल्याने विरोधकांनी त्या संचालकांचं कौतुक सुरू केलं! कसा होईल गोंधळ! ज्यांच्यावर आक्षेप होता, त्या बापूने सभात्याग केला! संचालक मंडळ निवडून आणणार्‍या नेत्याला सभात्याग करावा लागल्याची घटना मात्र पहिल्यांदाच घडली! मिच्छामी दुक्कडम्, म्हणत बापू बाहेर गेला नसेल ना रे!
पुढच्या वर्षी नव्हे दोन- तीन वर्षानंतर आता बापू पुन्हा सभासदांच्या समोर असेल! तोपर्यंत बापूसह सार्‍यांनाच मिच्छामी दुक्कडम् म्हणावं लागेल! दरवर्षी असं म्हणताना किमान मास्तरांना तरी काही वाटलं पाहिजे! चुकाच करायच्या नाही ना! मग, कशाला माफी मागायची वेळ येईल! ज्यांना निवडून आणलं तीच मंडळी विरोधात गेली! कालच्या सभेत बापूला सर्वाधिक वेदना झाल्या असतील. त्या होणे स्वाभाविक आहे! मात्र, पेरलं तेच उगवलं, असल्याच्या प्रतिक्रीया त्याच सभागृहात उमटत होत्या! विरोधकांना तर आयतं कोलीत मिळालं होतं. बँकेतील पदाधिकारी- संचालक यांच्या विरोधात बोलण्याचं, त्यांच्या चुका दाखवण्याचं सोडून सारे विरोधक त्या संचालकांचं कौतुक करताना दिसली. हे कौतुक करतानाही स्पर्धाच लागली होती.
मी- चांगलं काम केल्यामुळेच हे सारं झालं असेल!
श्रीगणेशा- खरंतर त्यावर विस्तारानं बोलावं लागेल आणि मोठा निबंधच लिहावा लागेल! चुका केल्याच आहेत. मात्र, त्या बाहेर यायला काही महिने जाऊ द्यावे लागतील. त्यानंतर त्या ज्यावेळी समोर येतील त्यावेळी काल कौतुक करणारे मोठ्या आवेगाने याच संचालकांच्या कंबरेत लाथा घालताना दिसेल तर आश्चर्य वाटू देऊ नकोस!
(पर्युषण पर्व आणि मास्तरांची बँक या विषयावर बराचवेळ भल्या पहाटे बोलणार्‍या बाप्पाला विषयांतर करत मुळ मुद्यावर आणण्याचा निर्णय मी घेतला.)
मी- बाप्पा, तुझ्या स्वागताच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांची रेेलचेल असणार आहे. यावेळी मोठा उत्साह संचारला आहे तुझ्या भक्तांमध्ये!
श्रीगणेशा- उत्साह नेहमीपेक्षा जास्तच दिसतोय! आमदारकीचे वेध अनेकांना लागलंय! त्यातून मंडळांचीही मोठी चांदी झालीय! मालामाल झालेल्या या मंडळींकडून कानठळ्या बसेपर्यंत माझ्या नावाचा आणि त्यांच्या नेत्याचा जयघोष! मंडळाच्या मंडपात माझ्यापेक्षा मोठी होर्डींग्ज लागलीत ती त्यांच्या नेत्यांची! त्यावर विस्तारानेच बोलेल! आता माझी वेळ संपलीय! पुन्हा उद्या नक्की भेटेल! (बाप्पा दुसर्‍या क्षणाला गायब झाला. मी देखील बेडरुममधून बाहेर आलो आणि तयारीला लागलो.)

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘श्री. तुळजाभवानी विद्यालयात गणित-विज्ञान, रांगोळी प्रदर्शन’; शिवांजली चोभे, सिद्धी परभणे यांना घवघवीत यश

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होऊन त्यांच्यामध्ये गणित, विज्ञान विषयाची आवड निर्माण...

फूटपाथवर झोपलेल्या तीन जणांचे डोळे पुन्हा उघडलेच नाही?; भरधाव डंपरने चिरडलं!

Accident News: रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पुण्याच्या वाघोली परिसरात भरधाव वेगाने आलेल्या एका डंपरने फूटपाथवर...

सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला; कारण काय?

Allu Arjun: साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या घराबाहेर उस्मानिया विद्यापीठाच्या ज्वाइंट अॅक्शन कमिटीच्या सदस्यांनी रविवारी...

नगर अर्बन बँक प्रकरण: ठेवीदारांसाठी महत्वाची अपडेट; ठेवी कधी मिळणार?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांना प्रचंड आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत...