पारनेर । नगर सहयाद्री:-
आमदार काशिनाथ दाते यांनी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे भक्कमपणे भूमिका मांडली. त्यांनी यावेळी पारनेर मतदार संघातील बाजरीचे बोगस बियाणे, बोगस कांदा बी विकणारे दलाल, यामुळे झालेले नुकसान, शेतकऱ्यांसाठी हमीभाव याबाबत त्यांनी आवाज उठवला. तसेच शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर शासन करा अशी मागणी केली.
पारनेर तालुक्यातील सर्वच गावांसह वासुंदे, वडगाव सावताळ, टाकळी ढोकेश्वर, कासारे, कर्जुले हर्या, तिखोल काकणेवाडी, गारगुंडी व इतरही भोवतालच्या गावांतील शेतकऱ्यांनी मे महिन्याच्या मध्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर मोठ्या आशेने खरीप हंगामासाठी बाजरीची पेरणी केली. मात्र बाजारातून विकत घेतलेले बियाणे बोगस असल्याचे निष्पन्न झाले. उगवणी न झाल्याने दुबार पेरणीची वेळ आली.
अगोदरच अवकाळी पावसामुळे या भागातील शेतकरी संकटात सापडला होता त्यात बाजरी पेरणीसाठी पैसे, वेळ व मेहनत वाया गेली. त्यांच्या कष्टांवर, त्यांच्या आशांवर अक्षरशः पाणी फिरले. या प्रकाराने शेतकऱ्यांचे केवळ आर्थिक नुकसानच झाले नाही, तर मानसिक ताण वाढवणारी निराशा त्यांच्या आयुष्यात अवतरल्याचे दिसत आहे. या भागातील शेतकऱ्यांनी सबंधित प्रकरणी प्रशासनाकडे तक्रार करत झालेल्या नुकसानीच्या भरपाईची मागणीही केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, याच भागात कांदा बियाणे विक्री करणारे बोगस दलाल मोठ्या प्रमाणात सक्रीय झाले असून ते चढ्या भावाने कांदा बियाण्याची विक्री करून शेतकऱ्यांची लुट करत आहेत. ह्या प्रकाराला पायबंद घालण्यासाठी बियाण्याची चढ्या भावाने विक्री करणारे दलाल व बोगस बाजरी बियाणे बाजारात आणणाऱ्या कंपन्या, वितरक यांच्यावर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली.
शेतकऱ्यांचे कष्ट वाया जाता कामा नये, त्यांच्या कष्टाला वाजवी मोल मिळाले पाहिजे या आत्मियतेच्या भावनेतून त्यांनी घेतल्या ठाम भूमिकेमुळे विधानसभेत या मुद्द्याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले असून शासनाकडून यावर त्वरित कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.