अहिल्यानगर / नगर सह्याद्री
पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याच्या रागातून दोघा भावांना लोखंडी गज व लाकडी दांडक्याने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार शनिवारी (1 फेब्रुवारी) सकाळी सव्वा दहाच्या सुमारास देहरे (ता. नगर) शिवारात घडला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चौघांविरूध्द रविवारी (2 फेब्रुवारी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवाजी दशरथ रोकडे (वय 60) यांनी फिर्याद दिली आहे. किशोर भाऊराव जाधव, रोहन किशोर जाधव, अक्षय किशोर जाधव व सुमन किशोर जाधव अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फिर्यादी व त्याचा भाऊ प्रमोद रोकडे शनिवारी सकाळी सव्वा दहा वाजता देहरे येथे चावडीवर बसलेले असताना, संशयित आरोपी किशोर जाधव व इतर चावडीवर आले. त्यांनी फिर्यादीस उद्देशून तुम्ही आमच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये केस का केली? असे विचारले आणि अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात किशोरने लोखंडी गजाने प्रमोद यांना मारहाण केली, तर रोहनने लाकडी दांडक्याने वार करून फिर्यादीस जखमी केले. त्यानंतर लाथाबुक्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली आणि पुन्हा पोलीस ठाण्यात गेलात तर काटा काढीन अशी धमकी दिली.
या प्रकारानंतर जखमींनी तातडीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार मिसाळ करीत आहेत.