मुंबई । नगर सहयाद्री: –
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उचलले आहे. विविध प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून, यामुळे ऐन सणासुदीत प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
एसटी कर्मचारी संघटनेकडून करण्यात आलेल्या संपाच्या प्रमुख मागणीमध्ये, राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी महामंडळातील कामगारांना वेतन देण्याची मागणी आहे. याशिवाय आर्थिक बाबी, खासगीकरण यासारख्या विविध मागण्यांसाठी विधानसभेची आचारसंहिता लागू होण्याआधी निर्णय घेण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
अकरा एसटी कामगार संघटनांनी एकत्र येऊन आज राज्यभरात आंदोलन पुकारले आहे. सणासुदीच्या काळात संप पुकारल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनी दोन सप्टेंबरपर्यंत शासनाला त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी मुदत दिली होती. या मुदतीत मागण्या मान्य न केल्यास ३ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला होता. संपामुळे एसटीला मोठा आर्थिक फटका बसणार आहे.