अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
भारतीय चलनाच्या 500 रुपयांच्या हुबेहूब बनावट नोटा छापून त्या चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा तरुणांना नगर तालुका पोलिसांच्या पथकाने पकडले आहे. त्यांच्या कडून बनावट नोटा, महिंद्रा कंपनीच्या थार गाडीसह सुमारे 17 लाख 37 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नगर सोलापूर महामार्गावर रुईछत्तीसी गावच्या शिवारात 27 जुलै रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. सोमनाथ माणिक शिंदे (वय 25, रा. तपोवन रोड, नगर) व निखील शिवाजी गांगर्डे (वय 27, रा. कोंभळी, ता. कर्जत) असे पकडलेल्या दोघांची नावे आहेत.
नगर तालुका पोलिस ठाण्याचे स.पो.नि. प्रल्हाद गिते यांना गोपनीय माहिती मिळाली की, रुईछत्तीसी परिसरात 2 इसम एका महिंद्रा थार गाडीत भारतीय चलनातील 500 रुपयांच्या बनावट नोटा घेवून त्या खऱ्या असल्याचे भासवून व्यवहार करण्यासाठी येत आहेत. ही माहिती मिळताच त्यांनी रात्र गस्त पथकाला बोलावून घेत पथकासोबत ते रुईछत्तीसी गावच्या शिवारात रात्री 10 वाजण्याच्या सुमारास जावून सापळा लावून थांबले, काही वेळातच संशयित थार गाडी (एम एच 16 डी एल 2797) त्यांना येताना दिसली.
पोलिसांनी ती गाडी थांबविली असता त्यात सोमनाथ शिंदे व निखील गांगर्डे हे बसलेले दिसले. पोलिसांनी पंचांच्या समक्ष त्यांची झडती घेतली असता सोमनाथ शिंदे याच्या खिशात 500 रुपयांच्या 100 बनावट नोटा आढळल्या. तर निखील गांगर्डे याच्या खिशात 500 रुपयांच्या 60 बनावट नोटा आढळल्या. त्या चलनात आल्या असत्या तर त्यांचे मूल्य 80 हजार एवढे झाले असते. पोलिसांनी त्या बनावट नोटा, दोघांकडील मोबाईल सोमनाथ शिंदे याच्या खिशातील 10, 20, 50, 100, 200 रुपयांच्या 2 हजार 870 रुपये किंमतीच्या खऱ्या नोटा, थार गाडी असा 17 लाख 37 हजार 870 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून दोघांना ताब्यात घेतले. या प्रकरणी पो.हे.कॉ. खंडेराव शिंदे यांच्या फिर्यादी वरून सोमनाथ शिंदे व निखील गांगर्डे या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.