अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी शहर पोलिसांनी बुधवारी (दि. 15) धडक कारवाई करत नियमबाह्य वर्तन करणाऱ्या वाहनचालकांना चांगलाच दणका दिला. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कारवाईत ’ड्रंक अँड ड्राइव्ह’, फॅन्सी नंबर प्लेट आणि मॉडिफाइड सायलेन्सर लावलेल्या एकूण 120 वाहनचालकांवर कारवाई करून तब्बल 1 लाख 50 हजार 700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या आदेशानुसार, शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ही विशेष मोहीम राबवण्यात आली. कोतवाली, तोफखाना आणि भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रमुख रस्ते आणि ब्लॅक स्पॉटवर नाकाबंदी करून ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेत प्रामुख्याने मद्यपान करून वाहन चालवणे (ड्रंक अँड ड्राइव्ह), वाहनांना नंबर प्लेट नसणे, फॅन्सी नंबर प्लेट लावणे, विना हेल्मेट प्रवास करणे आणि कर्कश आवाज करणाऱ्या मॉडिफफाइड सायलेन्सर लावलेल्या बुलेटस्वारांवर लक्ष केंद्रित करण्यात आले होते.
या कारवाई दरम्यान, मद्यपान करून धोकादायकरित्या वाहन चालवणाऱ्या दोन व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या या अचानक झालेल्या कारवाईमुळे बेशिस्त वाहनचालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. डॉ. दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईत कोतवालीचे पोलीस निरीक्षक गायकवाड, तोफखान्याचे आनंद कोकरे, शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक बोरसे आणि भिंगार कॅम्पचे सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांच्यासह तिन्ही पोलीस ठाण्यांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.