Maharashtra Crime News: कोल्हापूरमध्ये , झटपट श्रीमंत होण्याच्या नादात दोन तरुणांनी चक्क बनावट नोटा छापण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी, पोलिसांनी एका मेकॅनिक आणि एका मूर्तिकाराला अटक केली आहे. त्यांनी युट्यूबवरून नोटा छापण्याची माहिती मिळवली होती.
सिद्धेश श्रीकांत घाटगे (वय २६, रा. कळंबा), जो एक गॅरेजमध्ये मेकॅनिक म्हणून काम करतो, आणि विकास वसंत पानारी (३५, रा. शिंगणापूर, ता. करवीर), जो एक मूर्तिकार आहे, या दोघांना अटक करण्यात आली आहे. सिद्धेश दहावी उत्तीर्ण आहे, तर विकासने बी.ए. ची पदवी घेतली आहे.
आर्थिक अडचणीमुळे, त्यांनी कमी वेळेत जास्त पैसे कमवण्यासाठी बनावट नोटा छापण्याचा विचार केला.बनावट नोटा कशा छापायच्या, यासाठी लागणारे साहित्य कसे मिळवायचे, याची संपूर्ण माहिती या दोघांनी युट्यूबवरून मिळवली. त्यांनी बनावट नोटांसाठी लागणारा खास कागद आणि हाय सिक्युरिटी थ्रेड हाँगकाँगहून कुरिअरने मागवला.
कागद मिळाल्यानंतर, त्यांनी ५०, २०० आणि ५०० रुपयांच्या नोटांचे डिझाइन तयार केले आणि प्रायोगिक तत्त्वावर काही नोटांची छपाई देखील केली. या दोघांनी ५०० च्या चार, २०० च्या चार आणि ५० च्या सहा नोटा छापल्या होत्या. मात्र, या नोटा बाजारात चलनात आणण्यापूर्वीच, केंद्रीय तपास यंत्रणा आणि करवीर पोलिसांनी छापा टाकून दोघांना अटक केली. झटपट श्रीमंत होण्यासाठी युट्यूबवरून नोटांची छपाई केल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.