अहिल्यानगर | नगर सह्याद्री
स्वतःला निलंबित डीवायएसपी असल्याचे भासवून आणि प्लॉटिंग व्यवसायाच्या नावाखाली रेल्वे सुरक्षा दलातील दोन पोलीस शिपायांची ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार अहिल्यानगरमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी गजानन सखाराम बोडखे यांनी फिर्याद दिली असून, श्याम अजिनाथ साळुंखे व त्याचा भाऊ आकाश साळुंखे यांच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी बोडखे आणि त्यांचे सहकारी विशाल प्रभाकर पायघन हे अहिल्यानगर रेल्वे सुरक्षा बल येथे पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा आरोपी साळुंखेशी परिचय झाला. साळुंखे याने डीवायएसपी असल्याचे सांगून सध्या प्लॉटींगचा व्यवसाय करत असल्याचे सांगितले. त्याने दोघांनाही गुंतवणुकीची ऑफर दिली.
भोर गावाबाहेर मेडिकल कॉलेज होणार्या जागेवरील दोन प्लॉटसाठी प्रत्येकी २० लाख रुपये गुंठ्याप्रमाणे एकूण ४० लाख रुपये लागतील, असे आमिष त्याने दाखवले. त्यावर विश्वास ठेवून दोन्ही शिपायांनी बँक ऑफ इंडियाच्या लातूर शाखेतील आरोपीच्या खात्यावर आरटीजीएसद्वारे टप्प्याटप्प्याने एकूण ४० लाख रुपये वर्ग केले. यासाठी त्यांनी बँकेतून मोठे कर्जही काढले.पैसे घेऊनही प्लॉटची खरेदी करून न दिल्याने आणि नंतर विचारणा केली असता, केवळ वेळकाढूपणा केल्याने फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
आरोपी साळुंखे याने काही दिवसांनी ७ लाख रुपये परत केले, परंतु उर्वरित ३३ लाख रुपये देण्यास टाळाटाळ केली.या प्रकारानंतर, आपल्याला प्लॉट न देता विश्वासघात करून फसवणूक करण्यात आल्याची खात्री झाल्यावर बोडखे यांनी पोलिसांत धाव घेतली. या संपूर्ण प्रकरणात मुख्य आरोपी श्याम साळुंखे आणि त्याचा भाऊ आकाश साळुंखे यांचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहेत.



