मुंबई । नगर सहयाद्री:-
देशभरात पसरलेल्या दहशतवादी नेटवर्कवर मोठी कारवाई करत दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्ष आणि केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी एक मोठा कट उधळून लावला आहे. या कारवाईत तीन राज्यांमध्ये एकाचवेळी छापे टाकण्यात आले असून, आतापर्यंत ५ ISIS दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे.
मुंबई, दिल्ली आणि झारखंड येथे एकाचवेळी छापेमारी करण्यात आली. या कारवाईत मुंबईचे रहिवासी असलेल्या दोन संशयितांना दिल्लीमध्ये अटक करण्यात आली असून, त्यांच्या लपून बसलेल्या ठिकाणीही छापे टाकण्यात आले. त्यांच्याकडून शस्त्रास्त्रं आणि आयईडी (इम्प्रोवाईज्ड एक्स्प्लोसिव्ह डिव्हाइस) बनवण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
झारखंडमधील रांची येथून अशर दानिश नावाच्या संशयिताला अटक करण्यात आली. त्याच्याकडून रासायनिक आयईडी तयार करण्यासाठी वापरलं जाणारं साहित्य जप्त करण्यात आलं असून, यात हायड्रोक्लोरिक अॅसिड, नायट्रिक अॅसिड, सोडियम बायकार्बोनेट, सल्फर पावडर अशा धोकादायक रसायनांचा समावेश आहे.
तपासाची साखळी कशी उलगडली?
९ सप्टेंबर रोजी दिल्ली पोलिसांना एका गुप्त माहितीदाराकडून आफताब या संशयित दहशतवाद्याबद्दल माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी तत्काळ छापेमारी करत आफताबला अटक केली. त्याच्या चौकशीतून पुढे दानिशची माहिती उघड झाली. त्या आधारे रांचीमध्ये कारवाई करत दानिशलाही अटक करण्यात आली.
काय जप्त करण्यात आलं?
पिस्तूल, लॅपटॉप, मोबाईल फोन्स, डिजिटल उपकरणे, सर्किट, मदरबोर्ड, हायड्रोक्लोरिक अॅसिड, नायट्रिक अॅसिड सोडियम बायकार्बोनेट, सल्फर पावडर, पीएच व्हॅल्यू चेकर, बीकर सेट, सेफ्टी ग्लोव्हज, मास्क
या कारवाईमुळे देशभरात कार्यरत असलेल्या दहशतवादी नेटवर्कला मोठा हादरा बसला आहे. पुढील तपास दिल्ली पोलिसांची स्पेशल सेल आणि केंद्रीय तपास यंत्रणा करत आहेत.