नवी मुंबई | नगर सह्याद्री:-
लाडकी बहिण योजनेत गैरप्रकार झाल्याचे समोर आला असून सातारा येथील एका पट्ट्याने चक्क ३० अर्ज दाखल करत शासनाचे हजारो रूपये लाटले आहेत. नवी मुंबईतील खारघरमधील महिला पुजा प्रसाद महामुनी यांच्या आधारकार्डचा गैरवापर झाल्याचे समोर आल्यानंतर पनवेल तहसील कार्यालयात तक्रार केली असता हा प्रकार समोर आला आहे. महामुनी यांचा अर्ज वारंवार भरून देखील सबमिट होत नसल्याने त्यांनी भाजपचे माजी नगरसेवक निलेश बाविस्कर यांच्याकडे तक्रार केली. यानंतर निलेश बाविस्कर यांनी शोध घेतला असता पुजा महामुनी यांचा अर्ज आधीच अप्रूव्हड झाले असल्याचे समोर आले.
मात्र, त्यांच्या आधारकार्डला सातारा येथील जाधव नामक व्यक्तीचा मोबाईल नंबर अॅड झाला होता. याबाबत अधिक माहिती मिळवली असता या व्यक्तीने आपल्या पत्नीच्या नावे एक नव्हे तब्बल ३० अर्ज भरल्याचे दिसून आले. विशेष बाब म्हणजे, यापैकी २६वेळा पैसे देखील त्यांच्या खात्यात जमा झाले असल्याचं सांगण्यात येत आहे. म्हणजे तीन हजारप्रमाणे ७८ हजार मिळवाल्याचं सांगण्यात येत आहे. यानंतर सदरची तक्रार पनवेल तहसिलदारांकडे करण्यात आली असून तपास सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी असाच काहीसा धक्कादायक प्रकार यवतमाळ जिल्ह्यात समोर आला होता. यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी येथील जाफर गफ्फार शेख असं या तरुणाचे नाव आहे. जाफर शेख या तरुणाने साधा अर्जही केला नसताना त्याच्या खात्यात तीन हजार जमा झाल्याने शासनाच्या अजब कारभाराबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रकरणमुळे योजनेतील भोंगळ कारभार समोर आला आहे.जाफर शेख सुशिक्षित बेरोजगार आहे. त्याने लाडकी बहीण योजनेसाठी कोणताही अर्ज केला नसताना त्यांच्या बँक ऑफ बडोदाच्या खात्यात योजनेचे तीन हजार रुपये जमा झाले.
खात्यात जमा झालेली रक्कम पाहून तो चक्रावून गेला. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिलांनी दिवसभर रांगेत थांबून अर्ज भरला, कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी धावपळ केली. मात्र बँक खात्याला आधार लिंक नसल्याने अनेक पात्र महिलांच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही. दुसरीकडे कोणताही अर्ज न करता एका पुरुषाच्या खात्यात रक्कम जमा झाल्याने प्रशासनाच्या कारभारावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.