जामखेड । नगर सहयाद्री:-
तालुक्यातील बाळगव्हाण येथील शिकारे वस्ती वरील आरोपी शंकर सोपान शिकारे ( वय ३२) वर्ष यांने पुजारी कुशाबा शिकारे यांना जीवे ठार मारल्या प्रकरणी श्रीगोंदा न्यायालयाचे जिल्हा व सत्रन्यायाधीश एम. एस. शेख यांनी भादवी कलम ३०२ अन्वये आरोपी यास दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
तसेच रक्कम रुपये पाच हजार दंड व दंड न भरल्यास सहा महिने साधी कैदेची शिक्षा सुनावली आहे. सदर खटल्याचे कामकाज अतिरिक्त सरकारी वकील पुष्पा कापसे (गायके) यांनी पाहिले.
जामखेड तालुक्यातील बाळगव्हान शिकारे वस्ती येथील दत्त मंदिरातील पुजारी यांची कुशाबा शिकारे याची धारदार शस्राने वार करून हत्या केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी मयत पुजारी यांच्या पत्नी यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी संपूर्ण तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र पाठवले.
तपासा दरम्यान असे निष्पन्न झाले की, आरोपीच्या आजोबांनी आत्महत्या केली होती. यातील मयत कुशाबा शिकारे हा त्यांचे आत्महत्येस कारणीभूत असल्याचे संशयावरून आरोपी याने कुशाबा शिकारे यांचा खुन केला. सदर खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश मुजीब एस. शेख यांच्या न्यायालयात झाली.