अहमदनगर । नगर सहयाद्री:-
काटवन खंडोबा परिसरातील एक महिला वकिलाच्या घरात घुसून त्यांना मारहाण करून एक लाख 92 हजार 700 रुपयांचा ऐवज लुटणार्या सराईत गुन्हेगाराला कोतवाली पोलिसांनी कल्याणमधील विठ्ठलवाडी भागातून अटक केली आहे. किरण बबन कोळपे (वय 32, रा. विळद, ता. नगर) असे त्याचे नाव आहे.
2023 मध्ये राहुरी पोलीस ठाण्यात दरोड्याच्या गुन्ह्यात कोळपेवर मोक्का लावण्यात आला होता. त्या गुन्ह्यात अॅड. नाजमीन वजीर बागवान यांचे वकिलपत्र होते. अटक झाल्यावर जामीन मिळाल्यानंतर, 8 ऑगस्ट रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास कोळपे अॅड. बागवान यांच्या घरात घुसला आणि बळजबरीने त्यांचा हात पिरगाळून दुखापत केली. त्याने घरातील कपाट उचकवून एक लाख 92 हजार 700 रुपयांचा ऐवज चोरून नेला होता.
या गुन्ह्यात त्याला कोतवाली पोलिसांनी शुक्रवारी (9 ऑगस्ट) अटक करून वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले असता, तेथून तो पसार झाला होता. पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील, गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार योगेश भिंगारदिवे, अभय कदम, अमोल गाडे, विशाल दळवी, दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुंड्डू यांचे पथक त्याचा शोध घेत होते.
तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारावर कोळपे कल्याणमधील विठ्ठलवाडी भागात आढळला. रविवारी त्याला ताब्यात घेण्यात आले आहे . कोतवाली पोलिसांनी त्याला अॅड. बागवान यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात अटक करून पुढील कारवाईसाठी न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.