अहमदनगर । नगर सहयाद्री:-
जामखेड तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेचा भंग करणाऱ्या सहा गुंडांना तडीपार करण्यात आले आहे. शासकीय कामात अडथळा, शिवीगाळ, दमदाटी, गैर कायद्याची मंडळी जमवून खंडणी मागणे, हत्यारासह दरोडा टाकणे आणि घातक शस्त्रे जवळ बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे केल्यामुळे जामखेड पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल होते. या निर्णयामुळे परिसरातील गुंडांचे धाबे दणाणले आहेत.
तुषार हनुमंत पवार (वय १९, रा. जांबवाडी, ता. जामखेड, जि. अहमदनगर), अक्षयकुमार अभिमान शिंदे (वय २४, रा. पोकळे वस्ती, ता. जामखेड, जि. अहमदनगर), किरण ऊर्फ खंड्या रावसाहेब काळे (वय २८, रा. मिलींदनगर, ता. जामखेड), नितीन रोहीदास डोकडे (वय ३०, रा. गोरोबा टॉकीज शेजारी, ता. जामखेड), रमेश राजेंद्र काळे (वय ३८, रा. गोरोबा टॉकीज जवळ, ता. जामखेड), सिध्दांत ऊर्फ भाऊ राजु डाडर (वय ४६, रा. आरोळेवस्ती, ता. जामखेड) अशी तडीपार केलेल्या आरोपींची नावे आहेत.
या आरोपींना तडीपार करण्यासाठी जामखेड पोलिसांनी महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ५५ व कलम ५६ अन्वये पोलिस अधिक्षक तसेच उपविभागीय अधिकारी कर्जत विभाग यांच्याकडे प्रस्ताव दाखल केला होता. या प्रस्तावांवर पोलिस अधिक्षक तसेच उपविभागीय अधिकारी कर्जतयांनी सुनावणी घेवून वरील सर्व आरोपींना तडीपार केले आहे. या निर्णयामुळे जामखेड परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलीसांना यश मिळाले आहे, असे नागरिकांनी म्हटले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश पाटील आणि त्यांच्या पथकाने केली आहे.