पारनेर । नगर सहयाद्री
कान्हूर पठार येथील बैलपोळ्याचा सण तसेच पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी साजरी होणारी गौराई यात्रा, कुस्त्यांचा आखाडा पंचक्रोशीसह राज्यात प्रसिद्ध आहे. मात्र बैलपोळ्याचा मिरवणुकीत डीजेच्या कर्कश्श आवाजात अश्लील हावभाव करीत नाचवल्या जाणाऱ्या बारबाला, यात्रेदरम्यान मोठ्या प्रमाणावर खेळला जाणारा जुगार कान्हूरपठारच्या पुरोगामी विचारसरणीला काळीमा फासणारे आहेत. त्यामुळे बैलपोळ्याचा मिरवणुकीत वाजवले जाणारे डीजे, बारबालांचा नाच व यात्रेदरम्यान खेळला जाणारा जुगार बंद करावा, कान्हूर पठार गावाची पुरोगामी विचारांची परंपरा जपावी असे आवाहन महाराष्ट्र महिला विकास मंचाच्या कान्हूर पठार शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.
मंचाच्या राष्ट्रीय अध्यक्षा कालिंदी ठुबे यांनी यासंदर्भात पत्रक प्रसिद्धीसाठी दिले आहे. पत्रकावर उज्ज्वला मंदिलकर, छाया लोंढे, मोहीनी शिंदे, अर्चना लोंढे, किरण जोगी, प्रजापीता कदम, निशा मंदीलकर, संगीता व्यवहारे, राजश्री व्यवहारे, डॉ. प्राजक्ता ठुबे, कल्पना ठुबे, सविता व्यवहारे, भाग्यश्री लोंढे यांच्या सह्या आहेत.
पत्रकात म्हटले आहे की, गेल्या वर्षी जागतिक महिला दिनी, ८ मार्च २०२३ रोजी महाराष्ट्र महिला विकास मंचाच्या कान्हूरपठार शाखेच्या मागणीवरून महिला ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेत बैलपोळ्याचा मिरवणुकीत बारबालांच्या नाचगाण्यावर व डीजेच्या वापरावर बंदी घालण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला होता. मात्र गेल्या वर्षी दुर्दैवाने या ठरावाची अंमलबजावणी झाली नाही. मात्र यावर्षी जाणीवपूर्वक ठरावाची अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.