जामखेड । नगर सहयाद्री
रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे साकत परिसरातील नदी, ओढ्यांनी रौद्र रूप धारण केले होते. यामुळे अनेक वाड्या व वस्त्यांचा संपर्क तुटला होता. तसेच शेतीला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पीके पाण्याखाली गेले आहेत. पिंपळवाडी गावातील लेंडी नदीवर असलेला पुल आज झालेल्या अतिवृष्टीमुळे खचला आहे. त्यामुळे या मार्गावरून जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. वाहनचालकांनी या मार्गी जावू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
सध्या जामखेड सौताडा महामार्गाचे काम खुपच संथ गतीने सुरू आहे. यातच सौताडा जवळील पूल काही दिवसांपूर्वी वाहून गेला होता. तसेच रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे रस्ता वाहतुकीस योग्य नाही त्यामुळे अनेक वाहनधारक तसेच बीड, पाथर्डीकडे जाणारे वाहने पिंपळवाडी मार्गी वांजरा फाटा मार्गी जातात यात अनेक बस पण याच मार्गी जातात पण आता पुल खचल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. पिंपळवाडी ग्रामस्थांनी भर पावसात नदी किनारी येऊन वाहनचालकांना आवाहन केले व वाहने माघारी पाठवले काही बस तसेच मोठ्या प्रमाणावर खाजगी वाहने माघारी गेले. साकत कोल्हेवाडी मार्गावर साकत जवळ पुलावरून मोठ्या प्रमाणावर पाणी असल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
तसेच वराट वस्ती, कडभनवाडी या ठिकाणचा संपर्क तुटला आहे. लेंडी नदी व वांजरा नदीला पुर आल्यामुळे अनेक ठिकाणचा संपर्क तुटला होता. मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला यामुळे नदीला पूर आला होता यातच पिंपळवाडी जवळील लेंडी नदीवर असलेल्या पुलाला आगोदरच काही ठिकाणी तडे गेले होते. आता तर पुलच खचलेला आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. शालेय विद्यार्थी व नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागणार आहे. हा पुल पीएमजेएस कडे आहे. मोजमाप झाले आहे पण काम कधी होणार हीच नागरिकांना प्रतिक्षा आहे.
मुसळधार पावसामुळ नदीला पुर आला होता यातच जनार्दन घोलप यांच्या शेळ्या वाहून चालल्या होत्या शेळ्या पकडण्यासाठी ते गेले असता तेही वाहून चालले होते पण सुदैवाने ग्रामस्थांनी मदत केली शेळ्यासह घोलप यांना बाहेर काढले. तसेच पिंपळवाडी येथील पुल खचल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक ठप्प झाली होती. अनेक नागरिक अडकलेले होते. यावेळी पिंपळवाडी चे ग्रामस्थ दादासाहेब मोहिते, महारुद्र नेमाने, ईश्वर घोलप, मनोज नेमाने, शरद घोलप धीरज नेमाने, प्रविण घोलप, विशाल मोहिते यांनी नागरिकांना मदत केली तसेच वाहनचालकांनी या मार्गी न येता साकत पाटोदा मार्गी जावे असे आवाहन केले होते.
पारनेर, कर्जत, जामखेड, शेवगाव परिसरात पावसांची जोरदार हजेरी
रविवारी झालेल्या पावसाने नगर जिल्ह्यातील शेतकरी चांगलाच सुखावला आहे. जिल्ह्यातील पारनेर, कर्जत, जामखेड, शेवगाव परिसरात रविवारी झालेल्या पावसाने स्थानिक शेतकरी आनंदी झाला आहे. नगर शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात रविवारी ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर शहरासह परिसरात हलया स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे सायंकाळी आणि रात्री वातावरणातील गारवा वाढला होता. पारनेर तालुक्यातील विविध ठिकाणी पावसाने चांगलीच हजेरी लावली. शेवगाव तालुयात दुपारनंतर दमदार पावसाने हजेरी लावली. कर्जत, जामखेड व श्रीगोंदा परिसरात कमी आधिक प्रमाणात पाऊस कोसळत होता. नगर जिल्ह्यात रविवारपासून मंगळवारपर्यंत हवामान खात्याने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, रविवारी दिवसभर नगरशहरासह जिल्ह्यात दमट वातावरण होते. त्यामुळे अनेक ठिकामी कमी जास्त प्रमाणात पावसाची नोंद करण्यात आली आहे. या दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे.
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आकडेवारी नुसार रविवारी नगर मध्ये ५ मिली मीटर पाऊस नोंदविण्यात आला आहे. तर पारनेर मध्ये ८ मिमी, श्रीगोंदा २५.२ मिमी, कर्जत १४.९ मिमी, जामखेड ३५.१ मिमी, शेवगाव ३२.०२, पाथर्डी १५.४ मिमी, नेवासा ३०.७, राहुुरी ६.६, श्रीरामपूर २१.२ मिमी पाऊसांची नोंद झाली आहे. तर अन्य तालुक्यात कमी अधिक प्रमाणात पावसांची आकडेवार नोंदविण्यात आली आहे.