अहमदनगर । नगर सहयाद्री:-
नगर शहरातील प्रभाग क्रमांक 15 मधील आगरकर मळा येथील विविध परिसरामध्ये पिण्याच्या पाईप लाईनमध्ये ड्रेनेजचे दुर्गंधीयुक्त पाणी मिक्स होत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आले आहे. या प्रकारामुळे ज्येष्ठ नागरिक संतापले त्यांनी सदरची तक्रार नगरसेवक दत्ता जाधव यांच्याकडे केली. मैलामिश्रित पाण्याच्या बाटल्या हातात घेऊन निषेध नोंदवला व लवकर प्रभाग क्रमांक 15 मध्ये स्वच्छ पाणी सोडण्यासाठी मनपाने तातडीने उपाययोजना कराव्यात. ज्या भागातून पाणीपुरवठा केला जातो त्या टाक्या देखील स्वच्छ कराव्यात असे न झाल्यास मनपा आयुक्तांना हेच मलमिश्रित पाणी पाजू असा इशारा शिवसेना समन्वयक दत्ता जाधव यांनी दिला.
यावेळी नगरसेवक प्रशांत गायकवाड, युवराज खैरे, सचिन बनकर, ज्ञानेश्वर कविटकर, अशोक आगरकर, नूरआलम शेख, के.डी. खानदेशी, विजय लुणे, श्रीकृष्ण लांडगे, श्री.पत्रे सर, बाबुराव उगले, श्रीधर नांगरे, विठ्ठल मुळे आदिंसह नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी दत्ता जाधव म्हणाले, गेल्या अनेक महिन्यांपासून प्रभाग क्र. 15 मध्ये पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन पुर्णपणे बिघडली असून, त्याचा नागरिकांना मोठा त्रास होत आहे. पिण्याच्या पाण्याची अनियमितता, काही भागात पुर्णदाबाने पाणी येत नाही. तसेच मैला मिश्रित पाणी अशा समस्यांचा सामना करावा लागत आहे. सध्याही ड्रेनेज लाईन व पिण्याची पाईपलाईन काही ठिकाणी फुटलेली असल्याने दोन्ही पाणी मिक्स होऊन पिण्याचे पाणी ड्रेनेजयुक्त येत आहे.
त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत वेळावेळी प्रशासनास निवेदने देण्यात येतात, परंतु त्यावर काहीही उपाययोजना केल्या जात नाही. दोनच दिवसापुर्वी गाझीनगर परिसरातील महिलांनी पाणी प्रश्नाबाबत मनपा आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्यापुढे समस्या मांडल्या परंतु त्याबाबतही काही झाले नाही. तेव्हा यावर तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा हेच मैलामिश्रीत पाणी आयुक्त यांना पाजण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.