अहमदनगर । नगर सहयाद्री:-
विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची आज सोमवार दि १ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे शिक्षक आमदार कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सायंकाळी ५ वाजेपर्यंत कोणाची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे याचा कल समजणार आहे.
शिक्षक मतदारसंघासाठी २६ जून रोजी ६९ हजार ३६८ शिक्षक मतदारांपैकी ६४ हजार ८४६ शिक्षकांनी मतदान केले आहे. नाशिक येथील केंद्रीय वखार महामंडळाच्या अंबड गोदामात सकाळी ८ वाजता ३० टेबलांवर मतमोजणीस प्रारंभ होणार आहे.असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
एका टेबलावर एक हजार असे पहिल्या फेरीत ३० हजार मतांची मोजणी होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या फेरीत देखील एवढीच मतमोजणी होणार आहे. तिसऱ्या फेरीत फक्त ४ हजार ८४६ मतांची गणती होणार आहे. सायंकाळी ५ वाजता कोण विजयाच्या दिशेने आहे. याचा कल समजणार आहे. अंतिम निकाल रात्री उशिरा लागण्याची शक्यता आहे.
मतमोजणी अशी आहे तयारी
मतमोजणी कक्ष, निरीक्षक कक्ष, सुरक्षा कक्ष, माध्यम कक्ष, केंद्रावरील टेबल रचना, प्रकाश व्यवस्था, विद्युत पुरवठा, आरओ, एआरओ बैठक व्यवस्था, उमेदवारांसाठी बैठक व्यवस्था तसेच आवश्यक त्या कक्षांची उभारणी करण्यात आली आहे. उमेदवारांच्या मतमोजणी प्रतिनिधींनी नियुक्ती दिलेल्या ठिकाणीच थांबावे, असे आवाहन निवडणूक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
चौरंगी लढतीकडे मतदारांचे लक्ष
नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 21 उमेदवार रिंगणात आहे. मात्र महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे संदीप गुळवेमहायुतीतून शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडेतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महेंद्र भावसार आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्यात प्रामुख्याने चौरंगी लढत होत
असून कोण होणार शिक्षक आमदार? याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.