राहुरी । नगर सहयाद्री:-
बिबट्याच्या हल्ल्यानं अनेकदा परिसरात खळबळ पसरते. सध्या अशाच एका बातमीनं सगळीकडे खळबळ माजली आहे. एका बिबट्यानं दोन सुरक्षा रक्षकावर हल्ला केल्याची घटना घडली असून हल्ल्यात दोघे जखमी झाले. राहुल गायकवाड व राहुल बर्डे असे सुरक्षा रक्षकाचे नाव आहे.
अधिक माहिती अशी: शनिवार 22 जून रोजी रात्री 12 वाजेच्या सुमारास राहुरी कृषी विद्यापीठाच्या ‘इ’ विभागात राखणीवर असलेले सुरक्षा रक्षक राहुल गायकवाड व राहुल बर्डे यांच्यावर बिबट्याने अचानक झडप घेतली. यामध्ये सुरक्षा रक्षक गायकवाड व बर्डे हे खाली पडून जखमी झाले.
दरम्यान राहुल बर्डे यांनी विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांना सदर प्रकार कळवताच शेटे यांनी ताबडतोब गस्तीवर असलेले तीन सुरक्षा पर्यवेक्षक घटनास्थळी पाठवून जखमींना तातडीने राहुरी येथील रुग्णालयात नेऊन उपचार केले.वरवंडी, मुळानगर शिवारात मोठ्या प्रमाणात बिबट्यांची संख्या दिसून येत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात. तसेच वनविभागाकडून पिंजरे लावण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी सुरक्षा रक्षकांकडून होत आहे.