Politics News: महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीनंतर मोठी उलथा-पालथ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अशातचं आता लोकसभा निवडणुकीत भाजपच्या खराब कामगिरीनंतर माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी शनिवारी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे भाजपाला मोठा धक्का बसणार आहे.
२०१४ मध्ये राष्ट्रवादीशी फारकत घेतल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सूर्यकांता पाटील यांनी मराठवाड्यातील हिंगोली मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत पक्षाची उमेदवारी मागितली होती. परंतु त्यांना तिकीट मिळू शकले नाही. उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली होती
सूर्यकांता पाटील यांनी हिंगोली-नांदेड मतदारसंघाचे चार वेळा खासदार आणि एकदा आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. यूपीए सरकारच्या काळात त्या ग्रामीण विकास आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री होत्या. माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांत पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर आता भाजप पक्षासाठी हा मोठा धक्का आहे.
राजीनाम्याच्या पत्रात काय?
मी माझ्या प्राथमिक सदस्यत्वाचा तथा माझ्या 84 हदगावच्या संयोजकपदाचा राजीनामा देत आहे. आपल्यासोबत गेल्या 10 वर्षांपासून खूप काही शिकता आलं. तालुक्यात बुथ कमिटीपर्यंत काम केलं. आपण दिलेल्या संधीसाठी मी आपली आणि भाजपची अत्यंत आभारी आहे. मी आपला निरोप घेते. प्रत्यक्ष भेटीचा प्रयत्न केला. पण आपल्या व्यस्ततेमुळे ते शक्य झालं नाही. कोणतीही कटूता मनात न ठेवता मी आपला राजीनामा देत आहे. तो आपण स्विकारावा, ही विनंती, असं म्हणत सूर्यकांता पाटील यांनी आपला राजीनामा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सोपवला आहे.