जुना शिवसैनिक खासदार, उद्धव ठाकरेंचा आनंद गगनात मावेना – खा. नीलेश लंके | नगरमधील १२ आमदार निवडून आणण्याचा नारा
मुंबई | नगर सह्याद्री
मी खासदार झाल्यामुळे उद्धव ठाकरे साहेबांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. एका सामान्य कुटुंबातील शिवसैनिक खासदार झाला ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे, असे उद्धव साहेबांनी म्हटले. त्यांच्या मनात माझ्यासारख्या कार्यकर्त्याविषयी भावना होतीच, असे वक्तव्य अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांनी केले. निलेश लंके यांनी शनिवारी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
यावेळी खा. निलेश लंके यांनी उद्धव ठाकरे हे विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा श्रीगणेशा नगरमधून करणार असल्याचे सांगितले. त्यासाठी आम्ही नगरमध्ये भव्य मेळाव्याचे आयोजन करु. मी उद्धव साहेबांची भेट घेतल्यानंतर त्यांना सांगितले की, साहेब मी नगरमधून १२ पैकी १२ आमदार निवडून आणण्याचा नारा दिला आहे. उद्धव साहेबांनी लोकसभा निवडणुकीत माझ्या प्रचारासाठी येता न आल्याबद्दल खंत बोलून दाखवल्याचे निलेश लंके यांनी म्हटले.
बाळासाहेब ठाकरे यांचे एक वाय आठवते, ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण. बाळासाहेबांची प्रेरणा घेऊन मी प्रवास माझ्या राजकारणाचा सुरू केला होता. शिवसेनेत शाखाप्रमुख, गटप्रमुख, तालुकाप्रमुख अशी सगळी पदं मी भुषविली. मी खासदार म्हणून निवडून आलो, याचा उद्धव ठाकरे यांनासुद्धा खूप आनंद झाला. महाविकास आघाडीच्या एवढ्या जागा निवडून आल्यामुळेही ते समाधानी आहेत, असे लंके यांनी सांगितले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नगर शहर व पारनेर मतदारसंघातील प्रमुख पदाधिकार्यांनी खासदार नीलेश लंके यांच्या समवेत जात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी नगर शहर विधानसभा मतदारसंघावर दावा ठोकला आहे.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमदेवार डॉ. सुजय विखे पाटील यांचा पराभव करत महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आगामी तीन महिन्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे इच्छुकांन तयारी सुरु केली आहे. आगामी विधानसभा निवडणुका महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशाच पद्धतीने होणार असल्याचा अंदाज बांधला जात आहे. त्यानुसार त्या त्या पक्षाच्या नेत्यांकडून मतदारसंघांची चाचपणी सुरु आहे. तसेच पदाधिकार्यांकडून नेत्यांची मनधरणी सुरु झाली आहे.
नगर शहर व पारनेर विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या पदाधिकार्यांनी खासदार नीलेश लंके यांच्या समवेत जात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. दरम्यान ठाकरे यांनी मतदारसंघनिहाय आढावा घेतला. नगर शहर मतदारसंघ हो शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. २५ वर्ष अनिल भैय्या राठोड यांनी नेतृत्व केले आहे. त्यामुळे येथील जागा शिवसेनेकडे घेण्यात यावी अशी आग्रही मागणी पदाधिकार्यांनी केली. यावेळी संपर्क प्रमुख सुनील शिंदे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, उपजिल्हा प्रमुख संदेश कार्ले, शहर प्रमुख संभाजी कदम, विक्रम राठोड, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, सचिन शिंदे, शाम नळकांडे, दत्ता जाधव यांच्यासह नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होेते.
सुजय विखेंवर लंकेंचा निशाणा
सुजय विखे पाटील यांनी अहमदनगर मतदारसंघातील ४० केंद्रांवरील मतदान ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी याचिकेद्वारे केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने सुजय विखेंची याचिका फेटाळली होती. याबद्दल बोलताना निलेश लंके यांनी म्हटले की, काही लोकांना त्यांचा पराभव मान्य नाही. त्यामुळे ते असले रिकाटेकडे उद्योग करत आहेत. त्यांना जे करायचं ते करु द्या, मी माझ्या कामाला सुरुवात केली आहे, असे निलेश लंके यांनी म्हटले.
मातोश्री बाहेर झळकले खा. लंकेंच्या स्वागताचे बॅनर
निलेश लंके यांच्या स्वागतासाठी मातोश्रीबाहेर स्वागताचे बॅनर झळकले होते. या बॅनरवर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावान शिवसैनिक म्हणून निलेश लंके यांचा उल्लेख करण्यात आला होता. निलेश लंके यांच्या प्रचारात शिवसेना ठाकरे गटाचा मोठा वाटा होता. त्यामुळे आज नगर जिल्ह्यातील शिवसैनिकांसोबत मातोश्रीवर जाऊन लंके यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली.