जामखेड
शेतातील काम संपल्यानंतर बैलगाडीतून संध्याकाळी पती-पत्नी घरी परतत होते. यावेळी अचानक विद्युतपोलचा वीजप्रवाह रस्त्यावरील पाण्यात उतरला होता. याचा दरम्यान रस्त्यावरून जाणाऱ्या बैलगाडीच्या बैलांना विजेचा धक्का बसल्याने दोन्ही बैलांचा जागीच मृत्यू झाला. मात्र प्रसंगावधान राखून पती व पत्नी यांनी बैलगाडीतून बाहेर उड्या मारल्याने ते या आपघातुन बालंबाल बचावले आहे.
गुरुवार दि २० जुन रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास जामखेड तालुक्यातील वाघा गावातील शेतकरी सुखदेव बबन बारस्कर हे आपल्या पत्नीसह बैलगाडीतून शेतात गेले होते. दिवसभर शेतातील काम ओटपुन संध्याकाळी आपल्या घरी परतत होते. यावेळी पाऊस देखील सुरु होता. यावेळी बैलगाडीतून आपल्या घरी परतत असताना वाघा गावात एका लाईटच्या पोलचा वीज प्रवाह पावसाने रस्त्यावर साठलेल्या पाण्यात उतरला होता.
दरम्यान बैलगाडी तेथुन जात असतानाच बैलांना विजेचा धक्का बसला. त्यामध्ये दोन्हीही बैलाचा जागीच मृत्यू झाला तर प्रसंगावधान राखून पती पत्नी यांनी बैलगाडीतून बाहेर उड्या मारल्याने ते या आपघातुन बालंबाल बचावले. सदर घटनेमध्ये शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून तातडीने घटनेचा पंचनामा करुन शेतकर्यास आर्थिक मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थानांकडून होत आहे.