अहमदनगर | नगर सह्याद्री
पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पावसाने अहमदनगरच्या दक्षिण भागात दमदार हजेरी लावल्याने खरीप हंगामातील पेरण्यांना वेग आला आहे. तसेच पुढील चार दिवस मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
गतवर्षीपेक्षा यंदा समाधानकारक पाऊस होणार असल्याचा अंदाज यापूर्वीच हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यानुसार यंदा मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील दक्षिण भागात पेरणी योग्य पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पेरण्यांना वेग आला आहे. बि बियाणांसाठी शेतकर्यांची कृषी सेवा केंद्रांमध्ये लगभग दिसून येत आहे.
पावसाने हजेरी लावली असली तरी जिल्ह्यातील अनेक गावांत पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरु आहेत. गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. आता पुन्हा हवामान खात्याने पुढील चार दिवस जिल्ह्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस सांगितला आहे. त्यामुळे होणार्या पावसामुळे शेतकर्यांना पुन्हा दिलासा मिळणार आहे.