अहमदनगर। नगर सहयाद्री:-
लोकसभेची निवडणूक झाली असून आता मी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी जे झाले ते सोडून दिले आहे. विखे पाटील परिवार जिल्ह्यात मोठा परिवार आहे. सहकारात मोठे काम आहे. पद्मश्री विखे पाटलांनी आशिया खंडातील पहिला साखर कारखाना काढला. महसूलमंत्री माझ्या जिल्ह्यातील आहेत हे अभिमानाने सांगतो. डीपीडीसीतील एखादे काम असेल तर मी त्यांच्याकडे जाणार आहे. तसेच त्यांचा आशिर्वाद घेणार असल्याचे सांगत नगरमधील राजकारण आपल्याला बदलायचे आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन चालणार असल्याचे खासदार नीलेश लंके यांनी सांगितले.
विखे पाटील परिवाराविरूद्ध लोकसभा निवडणूक लढवून विजयी झालेल्या खासदार नीलेश लंके यांनी विखे पाटील परिवाराचे कौतूक करणारे वक्तव्य केले आहे. एवढेच नव्हे तर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आशीर्वाद घेऊन आपण काम करणार असल्याचेही लंके म्हणाले. या खासदार लंके यांच्या विधानाची राज्याच्या राजकारणात एकच चर्चा रंगू लागली आहे.
केडगाव मध्ये खा.नीलेश लंके यांचा सत्कारांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी खा.लंके यांनी विविध विषयांवर भाष्य केले. खा.लंके म्हणाले, निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात बोलावेच लागते. त्यावेळी माझ्याकडून एखादा शब्द गेला असेल. त्यांच्याकडूनही शब्द गेला असेल. मात्र, आता निवडणूक संपली आहे. त्यामुळे राजकीय विषय बंद. आता आपण कोणाच्याही विरोधात बोलणार नाही. विखे पाटील परिवार जिल्ह्यातील मोठा परिवार आहे. आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी उभा केला, याचा मला अभिमान आहे.
विखे पाटील कुटुंबाचे विकासात मोठे योगदान आहे. मी महाराष्ट्रभर फिरत असताना दुग्धविकास मंत्री माझ्या जिल्ह्यातील आहेत, हे मी अभिमानाने सांगत असतो. यापुढे जर माझे काही काम अडले, तर मी आता हक्काने पालकमंत्री म्हणून त्यांच्याकडे गेले पाहिजे. राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो. निवडणूक संपल्यावर राजकीय द्वेष सोडून देऊन सूडबुद्धीचे राजकारण आपल्याला बदलायचे असल्याचे खा.लंके म्हणाले.