अहमदनगर | नगर सह्याद्री
महापालिकेत उशिरा येणार्या कर्मचार्यांची झाडाझडती घेत कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्याच्या सुचना आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी दिल्या आहेत. महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे हे मनपा प्रशासकीय मुख्य कार्यालयात सकाळी साडेनऊ वाजताच हजर झाले.
यावेळी बोटावर मोजण्याइतकेच कर्मचारी हजर होते हे पाहताच आयुक्त संतापले आणि सर्व विभागाचे हजेरी रजिस्टर ताब्यात घेत गेटवरच खुर्ची टाकून बसले. व सर्व कर्मचार्यांना धारेवर धरत ऑफिसचा टाईम किती आहे याची विचारणा केली.
शिपाई यांना साडेनऊ तर अधिकारी यांना पावणेदहा वाजेपर्यंत कार्यालयात हजर असणे बंधनकारक असतानाही अधिकारी कर्मचारी साडेदहा वाजेपर्यंत कार्यालयामध्ये येत नाही हे पाहताच आयुक्त यांचा पारा चढला व प्रत्येक अधिकारी कर्मचारी यांची हजेरी घेत चांगलेच खडेबोल सुनावले.
उशिरा येणार्या कर्मचारी-अधिकार्यांवर कायदेशीर कारवाई करत दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना यावेळी दिल्या. तसेच प्रत्येक कर्मचार्याकडून साडे दहा वाजल्यानंतर आल्याबाबतचे कारण लेखी घेण्यात आले. यावेळी उशिरा येणारे कर्मचारी, अधिकारी, प्रभाग अधिकारी, उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना यावेळी दिल्या.