श्रीगोंदा । नगर सहयाद्री-
तालुक्यात एक दुर्देवी घटना घडली आहे. जनावरांना चारा आणण्यासाठी गेलेल्या १४ वर्षीय शाळकरी मुलाचा अपघाती मृत्यू झाला आहे. शनिवारी (दि. ८) सायंकाळी सहाच्या सुमारास वडाळी गावात घटना घडली आहे. सार्थक पांडुरंग वागस्कर (वय १४) असे अपघातात मृत झालेल्या मुलाचे नाव आहे.
अधिक माहिती अशी: वडाळी येथील इयत्ता आठवीमध्ये शिकणारा सार्थक पांडुरंग वागस्कर हा मुलगा सायंकाळी सहाच्या सुमारास जनावरांना लागणारा हिरवा चारा आणण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन गेला होता. गवत घेऊन येताना वडळी-श्रीगोंदा रस्त्यावरील तळ्याच्या भरावाखाली असलेल्या वळणाचा अंदाज न आल्याने त्याचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटला.
भरधाव ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला असलेल्या चारीमध्ये उलटला. या अपघातात मुलाच्या डोक्याला मार लागला. त्यात तो गंभीर जखमी झाला.या घटनेची माहिती समजताच मुलाच्या नातेवाइकांनी त्याला उपचारासाठी श्रीगोंदा येथील खासगी रुग्णालयात नेले. तेथे प्राथमिक उपचार करत पुढील उपचारासाठी नगर येथील खासगी रुग्णालयात नेत असताना सार्थक याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.