spot_img
अहमदनगरकेंद्रात मोदीची हॅटट्रीक! राज्यात पवारांचीच पॉवर

केंद्रात मोदीची हॅटट्रीक! राज्यात पवारांचीच पॉवर

spot_img

नवी दिल्ली | वृत्तसंस्था
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत केंद्रात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएला बहुमताचा आकडा मिळाला आहे. मात्र, चारेश पारचा देण्यात आलेला नारा मतदारांनी सपशेल नाकारला. मोदी सरकारने हॅटट्रीक साधली असली तरी या निवडणुकीत मोदी सरकारच्या विरोधात जनतेचा कौल राहिल्याचे स्पष्टपणे समोर आले. विशेषत: महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीला साथ देण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले.

राज्यातील ४८ जागांपैकी जवळपास तीस जागांवर मविआचे उमेदवार विजयी झाले. मुंबईतील जागांवर उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारांचा दणदणीत विजय झाला. कल्याण- ठाणे हे दोन्ही मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राखले. लोकसभेच्या सर्वाधिक ८० जागा असणार्‍या उत्तरप्रदेशात भाजपाला फाजील आत्मविश्वास नडला. मोदी- योगी अशी लाट चालेल या भ्रमात येथे भाजपा आघाडीला निम्म्या जागा देखील मिळू शकल्या नाही.

उत्तर प्रदेशात यावेळी किमान साठ जागा मिळतील असा अंदाज होता. मात्र, प्रत्यक्षात तसे झाले नाही. समाजवादी पार्टीने येथे जोरदार मुसंडी मारली. उत्तरप्रदेशात सपाटून मार खावा लागल्यानंतर इकडे महाराष्ट्रात महाविकास आघाडीने तीस जागांवर आघाडी घेत भाजपाला रोखले. या दोन राज्यातील जनतेने नाकारल्याने भाजपाला अपेक्षीत असणारे आकडे गाठता आले नाही.

आमचा स्ट्राईक रेट जास्त, पुढेही एकत्रच लढू- शरद पवार
मुंबई- बारामतीमधून माझ्या राजकारणाची सुरूवात झाली, त्यामुळे बारामती मतदारसंघामध्ये आम्हाला चांगलं लीड मिळालं, राज्यात ठाकरे-काँग्रेस आणि आम्ही जीवाभावाप्रमाणे लढलो असं शरद पवारांनी म्हटलं. देशाचा निकाल हा परिवर्तनाला पोषक असून पुढची दिशा ही इंडिया आघाडीच्या बैठकीत होईल असं शरद पवार म्हणाले. लोकसभा निवडणुकीचा हा निकाल परिवर्तनाला पोषक असा आहे. देशाच्या निकालात महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची दिसते. आमच्यापक्षाला चांगले यश मिळालं आहे. आम्ही जनतेची कृतज्ञता व्यक्त करतो. आमचा प्रयत्न राहणार आहे की देशात देखील चित्रं आशादायक आहे. उत्तर प्रदेशात देखील चांगला निकाल लागला आहे. यापूर्वी भाजपला जे यश मिळायचं त्यामध्ये मर्जिन मोठं असायचं. आता तसं चित्रं नाही. आम्ही सर्वांनी मिळून प्रयत्न केले. आम्ही ७ जागांवर यश प्राप्त करू असं चित्रं आहे. १० पैकी ७ जागा जिंकण मोठं आहे. आमचा स्ट्रइक रेट जास्त आहे. आम्ही महाविकस आघाडी केली त्यांना देखील यश चांगलं मिळालं. आम्ही जीवाभावाने काम करण्याची भूमीका घेतली त्यामुळं हे घडू शकलं. आम्ही तिघे देखील एकत्रित राहून आगामी निवडणुकीला समोर जाऊ असेही पवार यांनी स्पष्ट केले.

अजित पवारांना मोठा धक्का, सुप्रिया सुळेंचा विजय!
बारामती कुणाची? मोठ्या साहेबांची की अजितदादांची? गेल्या काही दिवसांपासून पडलेल्या प्रश्नाचं उत्तर आता मिळालं असून बारामतीकरांनी मुलीला म्हणजे सुप्रिया सुळेंना पसंती दिली आहे तर सुनेला म्हणजे सुनेत्रा पवारांना नाकारलं. राज्यातील सर्वाधिक प्रतिष्ठेची लढाई ही सुप्रिया सुळेंनी जिंकली आहे. त्यामुळे बारामतीच्या अतितटीच्या लढाईत काकांनी पुतण्याला धोबीपछाड देत आपणच बारामतीचे ’बॉस’ असल्याचा सिद्ध केलं. बारामतीतील पराभव हा अजित पवारांसाठी मोठा धक्का आहे. मतमोजणी सुरू झाल्यानंतर सुरुवातीपासूनच सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार याच्यामध्ये चढाओढ सुरू असल्याचं दिसून आलं. पण शेवटच्या टप्प्यात सुप्रिया सुळे यांनी निर्णायक आघाडी घेतली आणि विजयावर शिक्कामोर्तब केलं. त्यामुळे गेल्या ६० वर्षांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागलेल्या शरद पवारांनी आपल्या लेकीला निवडून आणत बारामती आपलीच आहे हा संदेश दिला.

ठाकरे- पवारांबद्दलची सहानुभूती मतपेटीत!
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी हे दोन्ही प्रमुख राजकीय पक्ष फोडण्याचे कटकारस्थान भाजपाच्या अंगलट आले. विशेषत: ठाकरे यांच्या पक्षासह त्यांचे निवडणूक चिन्हही काढून घेण्यात आल्यानंतर राज्यात संतापाची लाट निर्माण झाली. अजित पवार यांना सत्तेत घेण्याची गरज नसताना सत्तेत घेण्यात आले आणि त्यांनी केलेल्या भ्रष्ट कारभाराला क्लिन चिट देण्यात आल्यानंतर या संतापात भरच पडली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला थोडेफार यश आले असले तरी अजित पवार गटाकडून भाजपाचा भ्रमनिरास झाला. अजित पवार समर्थकांनी राज्यातील अन्य मतदारसंघात भाजपा उमेदवारांच्या विरोधात थेट भूमिका घेतल्याचेही काही ठिकाणी दिसून आले.

हुकुमशाहीची भिती अन् दलित- मुस्लिम मतदार निर्णायक ठरले
तिसर्‍यांदा मोदींची सत्ता आल्यास देशात हुकुमशाही येईल अशी भिती अनेकांच्या मनात निर्माण केली गेली. ईडी-सीबीआय या संस्थांच्या माध्यमातून जे झाले त्याचे पडसाद उमटले आणि त्यातून जनतेच्या मनात भाजपा आणि मोदींच्या हुकुमशाहीबद्दल भिती निर्माण झाली. विरोधकांनी हा मुद्दा थेटपणे मांडला आणि अनेक मतदारांना संपूर्ण देशात भावला. याशिवाय भाजपा पुन्हा सत्तेत आल्यास ते बाबासाहेब आंबेडकरांची घटना बदलतील असा प्रचार देखील झाला. या प्रचाराला दलित मतदार भावल्याचेही जाणवले. सर्वात महत्वाचे म्हणजे हिंदू राष्ट्र निर्माण करण्याच्या संकल्पनेतून मुस्लिमांवर थेट हल्लाबोल करणे नरेंद्र मोदी आणि भाजपाला महागात पडले. संपूर्ण देशभरातील मुस्लिमांनी भाजपा विरोधी मतदानाचा निर्णय घेतल्याचे आणि तसे आदेशच निघाल्याचे मतदानाच्या दिवशी सर्वत्र दिसून आले. त्यातून हे सारेच घटक निर्णायक ठरल्याचे मतमोजणीनंतर स्पष्टपणे समोर आले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डॉल्बी डीजे अन् लेसर लाईट्सचं काय?

पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष | जाताजाता बाप्पा म्हणाला; पुढच्या वर्षी नव्हे रे, रोजच भेटणार मी...

खा. नीलेश लंके यांना पत्र दिलेच नाही?; आ. टिळेकर यांच्याकडून ‘इन्कार’

पारनेर | नगर सह्याद्री:- मी भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. विधान परिषदेचा आमदार म्हणून मी राज्यात...

‘मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून कमी करण्याचे षडयंत्र’

अहमदनगर । नगर सहयाद्री:- शासनाला हाताशी धरून काही विघ्नसंतोषी लोक मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून...

बिबट्याच्या हल्ल्यात सात शेळ्या गेल्या; ‘या’ परिसरात ‘तीन’ बिबटे

पारनेर । नगर सहयाद्री :- तालुक्यातील पठार भागावरील गारगुंडी येथे गावाजवळील शेख वस्तीवरील आमीनभाई शेख...