अहमदनगर | नगर सह्याद्री
अहमदनगर महानगरपालिकेच्यावतीने उपायुक्त डॉ. विजयकुमार मुंडे यांनी शहरातील विविध मूर्ती कारखान्यांची तपासणी केली. या तपासणीत प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मोठ्या प्रमाणात मूर्ती आढळून आल्या. याबाबतचा अहवाल उपायुक्त मुंडे आयुक्तांना देणार आहेत. महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे याबाबत काय भूमिका घेतात याकडे आता लक्ष लागले आहे.
शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पर्यावरण पूरक मूर्ती निर्मिती करण्याचे आदेश मूर्ती कारखान्यांना देण्यात आले आहेत. असे असतानाही अनेक ठिकाणी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती निर्मिती होताना दिसून येत आहेत. याबाबत महापालिकेत झालेल्या बैठकीत पर्यावरण पूरक मूर्ती तयार करण्यात याव्यात अशा स्पष्ट सूचना देण्यात आली होत्या. तसेच शहरातील पर्यावरण पूरक मूर्ती निर्मिती करणार्या कारखानदारांनी महापालिकेत अधिकृत नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
महापालिका प्रशासने उपायुक्त डॉ. मुंडे यांनी शहरातील विविध मूर्ती कारखान्यांची तपासणी केली. या तपासणीत बर्यास ठिकाणी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आढळून आल्या आहेत. दरम्यान याबाबत मूर्ती बनवणार्या कारखान्यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली होती. तसेच प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवण्याचे काम अनेक दिवसांपासून सुरु झाले असल्याचे कारखाना चालकांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता महापालिका काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.