नवी दिल्ली / वृत्तसंस्था
मोदी सरकारच्या धोरणांविरोधात सातत्याने आवाज उठवणारे अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांनी लोकसभा निवडणुकीबाबत मोठे विधान केले आहे. तिसर्यांना नरेंद्र मोदी पंतप्रधान बनले नाही तरी भारताची अर्थव्यवस्था चालत राहणार असल्याचे ते म्हणाले आहेत.
लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आहे. यंदा ही निवडणूक एकूण सात टप्प्यांमध्ये घेतली जात असून यापैकी सहा टप्प्यांमधील मतदान पार पडलं आहे. आता १ जून रोजी सातव्या टप्प्यातील मतदान होईल आणि ४ जून रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल. या निवडणुकीतील जय-पराजयाबद्दल सत्ताधारी आणि विरोधक वेगवेगळे दावे करत आहेत. भाजपाप्रणित एनडीएने दावा केला आहे की, त्यांना या निवडणुकीत ४०० हून अधिक जागा मिळतील. तर विरोधी पक्ष दावा करत आहेत की, भाजपा केवळ २०० ते २५० जागाच जिंकेल. दरम्यान, भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी म्हटलं आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसर्यांदा पंतप्रधान बनो अथवा न बनो, भारत आपल्या आर्थिक धोरणांनुसार पुढे चालत राहील. या निवडणुकीच्या निकालाचा देशाच्या आर्थिक धोरणांवर काहीच परिणाम होणार नाही.
मोदी सरकारच्या धोरणांविरोधात सातत्याने आवाज उठवणारे अर्थतज्ज्ञ रघुराम राजन सध्या अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो बूथ स्कूल ऑफ बिझनेसमध्ये अद्यापनाचं काम करत आहेत. या विद्यापीठात रघुराम राजन हे अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत. राजन यांनी नुकतीच ब्लूमबर्ग टीव्हीला एक मुलाखत दिली. यावेळी त्यांनी भारताची आर्थिक धोरणं, निवडणुकीचे त्यावरील परिणाम आणि आगामी वाटचालीवर भाष्य केलं.
रघुराम राजन म्हणाले, भारताच्या आर्थिक धोरणांमध्ये सातत्य आहे. भारतात जे सरकार येईल ते त्यांच्याबरोबर काही नव्या गोष्टी घेऊन येईल. तसेच नवं सरकार लवकरच अर्थसंकल्पाची घोषणा करू शकतं. स्थगित असलेली शासकीय कामं आता पुन्हा सुरू होतील. नवं सरकार कोणत्या नव्या गोष्टी करेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मोदी सरकारने यापूर्वी देशातील पायाभूत सुविधांकडे लक्ष देणं आवश्यक होतं. मोदींच्या सरकारने यासाठी देशाच्या तिजोरीतून पैसे काढायला हवे होते, खर्च करायला हवे होते. त्यामुळे नव्या सरकारला यावर लक्ष द्यावं लागेल, यासह पायाभूत सुविधांच्या दर्जाकडेही पाहावं लागेल. तसेच याचा फायदा केवळ मोठ्या कंपन्यांनाच न मिळता लहान कंपन्या आणि छोट्या व्यापार्यांनाही मिळायला हवा.