मुंबई। नगर सहयाद्री-
आज रविवारी दि. २६ मे रोजी रात्रीच्या सुमारास बंगालच्या उपसागरात ‘रेमल’ चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे, ‘रेमल’ ‘चक्रीवादळ ताशी ११०-१२० किलोमीटर वेगाने किनारपट्टीवर धडकू शकते. या काळात समुद्रात १.५ मीटर उंच लाटा येण्याची शक्यता आहे, त्यामुळे हवामान खात्याने मच्छिमारांना २७ ‘मे’च्या सकाळपर्यंत बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडील भागात जाऊ नये अशा सूचना दिल्या आहेत.
‘रेमल’ चक्रीवादळामुळे, कोलकाता विमानतळावरील विमानसेवा रविवारी दुपारी १२ ते सोमवारी सकाळी ९ वाजेपर्यंत २१ तासांसाठी बंद राहणार आहे. त्याच बरोबर बंगाल सरकारने शनिवारी एक बैठक घेतली आणि चक्रीवादळाचा सामना करण्याच्या तयारीचा आढावा घेतला. तसेच बंगालमधील श्यामा प्रसाद मुखर्जी बंदरातील सर्व मालवाहू कामे १२ तासांसाठी बंद ठेवण्यात आले आहे.
हवामान खात्याने २६-२७ मे रोजी दक्षिण २४ परगणामध्ये १०० ते ११० किमी प्रतितास आणि उत्तर २४ परगणामध्ये ताशी ९० ते १०० किमी प्रतितास ते ११० किमी प्रति तास वाऱ्याचा वेग वाहण्याचा इशारा दिला आहे. विभागाने कोलकाता, हावडा, नादिया आणि पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होणार नाही, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.