मुंबई / नगर सह्याद्री –
देशात सध्या गरमीमुळे सगळ्यांच्याच जीवाची लाही लाही होत आहे. त्यातच यात आणखी भर पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कारण पुढील पाच दिवस देशात उष्णतेपासून दिलासा मिळण्याची आशा नाही. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ४७ अंश सेल्सिअसवर पोहोचल्याचे आयएमडीने म्हटले आहे. येत्या काही दिवसांत कमाल आणि किमान तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत येत्या काही दिवसांत काही ठिकाणी पारा 50 अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.
हवामानशास्त्र विभागाने पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात आणि उत्तर-पश्चिम मध्य प्रदेशात या राज्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. आजारी लोकांसाठी अत्यंत काळजी घेण्यावर भर दिला आहे. या काळात हिमाचल प्रदेशच्या खालच्या टेकड्यांमध्ये तीव्र उष्णता कायम राहील” असे म्हटले आहे.
राजस्थान, हरियाणा, दिल्ली, चंदीगड आणि उत्तर प्रदेशच्या अनेक भागांमध्ये मंगळवारी कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या वर राहिले, त्यामुळे दैनंदिन जीवनावर परिणाम झाला आणि अनेकांनी दुपारी घरातच राहणे पसंत केले. गुजरातच्या काही भागातही लोकांना उष्मा आणि आर्द्रतेचा सामना करावा लागत आहे.
हरियाणातील सिरसा येथे मंगळवारी पारा ४७.८ अंश सेल्सिअसवर पोहोचला आणि ते देशातील सर्वात उष्ण ठिकाण ठरले. दिल्लीत मागील दिवसांच्या तुलनेत तापमानात काहीशी घसरण झाली होती, परंतु ते सामान्यपेक्षा तीन ते पाच अंशांनी जास्त राहिले.
येत्या चार ते पाच दिवसांत कमाल आणि किमान तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ होण्याची शक्यता असल्याने तीव्र उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता नाही, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) म्हटले आहे.
हवामान केंद्र जयपूरच्या म्हणण्यानुसार, येत्या 72 तासांत कमाल तापमानात दोन अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसांत राज्यात बहुतांश ठिकाणी उष्णतेची लाट तर काही ठिकाणी तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. सलग तीन वर्षांपासून भारताच्या काही भागांमध्ये अति उष्णतेने मोठ्या प्रमाणात लोक प्रभावित झाले आहेत.