spot_img
अहमदनगरअबब...! पारनेर ग्रामीण रुग्णालयात दगावले कोवीडचे ९७ रुग्ण; भाळवणीच्या ‘त्या’ कोवीड सेंटरमध्ये...

अबब…! पारनेर ग्रामीण रुग्णालयात दगावले कोवीडचे ९७ रुग्ण; भाळवणीच्या ‘त्या’ कोवीड सेंटरमध्ये हेराफेरी!

spot_img

माजी नगराध्यक्ष विजय औटी यांचा गंभीर आरोप | ग्रामीण रुग्णालय म्हणते, हा आकडा भाळवणीचा! भाळवणीतील अत्यवस्थ रुग्ण संदर्भित केले पारनेरला, पण प्रत्यक्षात हलवले नगरला
पारनेर | नगर सह्याद्री
जिल्हा आरोग्य विभाग आणि सिव्हील हॉस्पिटल यांच्याकडे नीलेश लंके प्रतिष्ठान संचालीत भाळवणी येथील शरदचंद्र पवारसाहेब कोवीड सेंटरचे कोणतेही दप्तर उपलब्ध नाही. त्यामुळे येथे किती रुग्ण दाखल झाले होते, किती रुग्णांवर उपचार देण्यात आले याची कोणतीही अधिकृत सरकारी आकडेवारी उपलब्ध नसल्याचा गंभीर आरोप पारनेरचे माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी यांनी केला आहे. कोवीडच्या दुसर्‍या लाटेत दगावणार्‍या रुग्णांची संख्या जास्त होती. अत्यवस्थ झालेले रुग्ण भाळवणीतून नगरला हलविण्यात येत असताना रुग्ण दगावत असल्याचा बोभाटा टाळण्यासाठी भाळवणी येथील या कोवीड सेंटरचे रुग्ण पारनेरच्या ग्रामीण रुग्णालयात हलविल्याचे आणि तेथे ते मयत झाल्याचे दाखविण्यात आले. त्यामुळे पारनेरमधील ग्रामीण रुग्णालयातील दुसर्‍या लाटेतील मृत रुग्णांचा आकडा १११ वर गेल्याची नोंद झाली. अर्थात हा आकडा यापेक्षा जास्त आहे. मात्र, सरकारी नोंद झालेली ही आकडेवारी आहे. भाळवणी कोवीड सेंटरमध्ये अस्वस्थ वाटू लागलेले सर्वच रुग्ण नगरला हलविण्यात आले असताना त्यांची नोंद पारनेरला हलविण्यात आले अशी करण्यात आली. पारनेरला हलवले असे दाखविण्यात आलेल्या या रुग्णांपैकी तब्बल १११ रुग्ण दगावले! अर्थात ही नोंद सरकारी कागदावर असली तरी आकडा यापेक्षा मोठा असल्याचा गंभीर आरोप पारनेरचे माजी नगराध्यक्ष विजय औटी यांनी केला आहे.

कोवीड कालावधीत संसर्ग झालेल्या रुग्णांसाठी कोवीड सेंटर आणि कोवीड हॉस्पिटलला परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार रुग्णांवर उपचार करण्यात येत होते. पारनेर तालुक्यात नीलेश लंके प्रतिष्ठानच्या शरदचंद्र पवारसाहेब कोवीड सेंटरसह अन्य १४ ठिकाणी कोवीड रुग्णांवर उपचार करण्यात येत होते. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागासह जिल्हा सरकारी रुग्णालय (सिव्हील हॉस्पिटल) या दोन्ही ठिकाणी लंके यांच्या भाळवणीतील शरदचंद्र पवार साहेब कोवीड सेंटर या सेंटरची कोणतीच नोंद नसल्याचा आरोप औटी यांनी केला आहे. या कोवीड सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण दगावले आणि रुग्णांची हेळसांड देखील झाली. त्यामुळेच हे बींग बाहेर पडू नये यासाठी लंके यांनी त्यांच्या आमदारकीचा दबाव आणतानाच काही अधिकार्‍यांना मारहाण करण्यापर्यंत मजल नेली आणि त्यातूनच या कोवीड सेंटरचे नाव दप्तरातून गायब केल्याचा गंभीर आरोप विजय औटी यांनी केला.

आकडे बोलतात!
दप्तरी नोंद झालेल्या
कोवीड मृतांची संख्या!
पारनेर कोवीड सेंटर –       १२
भाळवणी कोवीड सेंटर –        २
ग्रामीण रुग्णालय, पारनेर – ८५+१२= ९७
एकूण           –      १११
(हा आकडा फक्त सरकारी आहे. खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना मयत झालेल्या रुग्णांचा यात समावेश नाही. कारण, कोरोनाच्या लाटेत नगर जिल्ह्यात मृत्युची नोंद झालेल्यांचा सरकारी आकडा ७ हजार ९५३ इतका आहे. मात्र, कोवीडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना सानुग्रह अनुदान देण्याचा आदेश सरकारचा आदेश निघाल्यानंतर या अनुदानासाठी अर्ज केलेेल्यांची संख्या १८ हजार ४५६ इतकी आहे. याचाच अर्थ कोवीडमुळे दगावलेल्या अनेकांच्या नोंदी सरकारी हॉस्पिटलमध्ये झाल्याच नव्हत्या असा दावा विजय औटी यांनी केला आहे.)

कोवीड सेंटरला आर्थिक मदत केल्याचे दूध संघासह दोघांचे
विजय औटी यांनी सादर केले प्रातिनिधीक पुरावे!
कोवीड सेंटरमध्ये चांगले समाजसेवेचे काम चालू असल्याचे अनेकांना वाटले. त्यातून अनेकांनी थेट प्रतिष्ठानच्या बँक खात्यात तर काहींनी चेकद्वारे देणग्या दिल्याचे निदर्शनास आणून देतानाच नगर तालुका सहकारी दूध व्यावसायिक प्रक्रिया संघाने ५ लाख ११ हजार रुपयांचा जिल्हा बँकेच्या सावेडी शाखेतील संघाच्या करंट खाते क्रमांक ०१६१११०१९००००५४ खात्याचा दि. २६/४/२०२१ रोजी धनादेश (चेक क्र. ००७१०२) दिला होता. कल्पक इंडस्ट्रीजने अहमदनगर मर्चंटस बँक, चितळेरोड चौपाटी कारंजा शाखेतील खाते क्र. ००५००५२० ००००००८ मधील चेक क्र. ००७०३१ नुसार १ लाख रुपयांचा दि.२६/४/२०२१ धनादेश दिला होता. अभिजीत अशोक काळे यांनी अहमदनगर शहर सहकारी बँकेच्या तारकपूर शाखेतील करंट खाते क्र. १०१६०४१८००००११९ चा १ लाख १ हजार रुपयांचा दि. २६/४/२०२१ या दिनांकाचा उल्लेख असणारा धनादेश क्र. ०८३३२५ दिला होता. ही तीन उदाहरणे प्रातिनिधीक आहेत. नीलेश लंके प्रतिष्ठानला पारनेर, नगरसह मुंबई- पुण्यातून आणि संपूर्ण देश आणि देशाच्या बाहेरुन म्हणजेच कॅनडा, अमेरिका, रशिया येथूनही मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत मिळाली. प्रतिष्ठानच्या खात्यावर आलेल्या या रकमेचा विनियोग नीलेश लंके व त्यांच्या टोळीने कशासाठी केला हे जनतेसमोर यावे अशी मागणी विजय औटी यांनी केली आहे.

वाळूची गाडी न सोडणार्‍या उपजिल्हाधिकार्‍याला
पोलीस निरीक्षकासमोर ‘बिहारी’ स्टाईल कोणी चोपले?
भाळवणीचे कोवीड सेंटर हे कोवीड रुग्णांवर प्राथमिक उपचार करण्यासाठी होते की पिकनीक सेंटर होते असा प्रश्न त्यावेळी अनेकांनी उपस्थित केला होता असे निदर्शनास आणून देतानाच औटी यांनी या सेंटरमधील धक्कादायक प्रकाराची पोलखोल केली. नीलेश लंके यांच्या एका समर्थकाचे चोरटी वाळू वाहतूक करणारे वाहन तत्कालीन जिल्हा गौण खनिज अधिकार्‍याने पकडले. त्याच्या पंचनाम्याच्या आणि वाहन ताब्यात दिल्याच्या प्रति विजय औटी यांनी माहितीच्या अधिकारात प्राप्त करून घेतल्या असून त्या मिडीयासमोर सादर केल्या. या अधिकार्‍याने त्याची शासकीय ड्युटी केली असताना त्या अधिकार्‍याला ते वाहन सोडून देण्याचे फर्मान नीलेश लंके यांनी सोडले. मात्र, त्यांनी तसे केले नाही. याचा राग मनात धरत नीलेश लंके यांनी गौण खनिज अधिकार्‍याला भाळवणीतील कोवीड सेंटरमध्ये बोलावून घेतले. या सेंटरमध्ये सदरचा अधिकारी आल्यानंतर त्या अधिकार्‍याला एका बंद खोलीत नेण्यात आले. तेथे आधीच दोन- तीन वाळू तस्कर, जिल्हा परिषद शाळेचा मास्तर असे हातात दांडके घेऊन बसले होते. गौण खनिज अधिकारी आत येताच त्या खोलीचा दरवाजा आतून बंद करण्यात आला. त्या अधिकार्‍याला सार्‍यांनी मिळून दांडक्याने बदडून काढले. हा सारा प्रकार पोलिस अधिकार्‍याच्या साक्षीने घडल्याचा आरोप देखील औटी यांनी केला. मारहाण झाल्यानंतर तसे काहीच झालेेच नाही या थाटात त्या अधिकार्‍याच्या गळ्यात हात टाकून मित्रासारख्या गप्पा मारत बाहेर आणले आणि कोवीड सेंटरमधील मटणाचे जेवण खायला भाग पाडले. असाच मारहाणीचा प्रकार वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या बाबतही घडला आहे. त्यामुळे हे कोवीड सेंटर रुग्णांसाठी होते की आडव्या येणार्‍या अधिकार्‍यांना ठोकण्यासाठी होते असा सवाल औटी यांनी उपस्थित केला आहे.

कोवीड सेंटरचे संपूर्ण दप्तरच गायब;
‘त्या’ दोन डॉक्टरांवर कारवाई करा!
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सहानुभूती मिळवतानाच त्यांच्याकडून विविध कंपन्या तसेच देणगीदार मिळवले. त्यातूनच या कोविड सेंटरसाठी शरद पवार यांनी रुग्णवाहिका दिली. अर्थात या रुग्णवाहिकेला डिझेल आणि चालक यांचे बील नीलेश लंके यांनी अथवा त्यांच्या प्रतिष्ठानने देणे आवश्यक असताना ते देखील सरकारकडून वसुल करण्यात आले. या कोवीड सेंंटरमध्ये किती रुग्ण दाखल होते, किती रुग्णांवर उपचार केले, किती रुग्ण दुसरीकडे संदर्भित केले आणि किती रुग्ण दगावले याची नोंद घेण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात हे संपूर्ण दप्तरच गायब करण्यात आले असल्याचा गंभीर आरोप औटी यांनी केला आहे. हे दप्तर पारनेर आणि भाळवणी येथील लंके यांच्या समर्थक असणार्‍या खासगी डॉक्टरच्या ताब्यात असून त्यांच्याकडे हे दप्तर मागणीसाठी गेलेल्या आरोग्य अधिकार्‍यांना मारहाण करण्यापर्यंत त्यांची मजल गेली असून या दोन्ही डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणीही औटी यांनी केली आहे.

हजारो टन धान्य, अंडी, भाजीपाला,
पाणी बाटल्या, बिस्कीट देणग्यांचे काय?
कोवीडच्या कालावधीत येथे चांगले काम चालू असल्याचा कांगावा झाला. रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना आधार मिळत असल्याचे जाणवले आणि चांगले काम होत असल्याचे पाहून काहींनी रोख स्वरुपात तर काहींनी वस्तुस्वरुपात मदतीचा हात पुढे केला. यामध्ये गावोगाव फिरुन नीलेश लंके समर्थकांनी हजारो टन गहू- ज्वारी, तांदूळ दिले. याशिवाय भाजीपाला, अंडी, दूध, हजारो लिटर पाण्याच्या बाटल्या, फळे हे देखील अनेकांनी दिले. स्वयंपाक करणार्‍यांनी सेवा म्हणून काम केले. अनेकांनी गॅस टाक्या दिल्या. हे सारे मोफत देणगी आणि मदत म्हणून मिळत असताना त्याचा हिशोब जनतेला मिळणार आहे की नाही असा सवालही विजय औटी यांनी उपस्थित केला आहे. काही टन धान्य याच कोवीड सेंटरमधून बाजारात विकले त्याचा हिशोब द्या अशी मागणीही विजय औटी यांनी केली.

कॅनडा, रशिया, अमेरिकेसह संपूर्ण देशातील
कोट्यवधींच्या मदतीचा हिशोब कधी देणार?
कोवीड सेंटर वस्तुस्वरुपात मोठ्या प्रमाणात देणग्या- मदत मिळत असताना दुसरीकडे रोख स्वरुपात आणि नीलेश लंके प्रतिष्ठानच्या जाहीर करण्यात आलेल्या बँक खात्यात रोज लाखो रुपयांच्या देणग्या जमा होत होत्या. याच्या बातम्या देखील रोज काही दैनिकांंमध्ये प्रकाशित झाल्या आहेत. त्या देखील आमच्याकडे पुरावे म्हणून आहेत. राज्याच्या कानाकोपर्‍यातून जसा येथे आर्थिक मदतीचा हात पुढे आला होता, तसाच तो देशातून आणि परदेशातूनही पुढे आला होता. कॅनडा, रशिया, अमेरीका येथील काही दानशुरांनी या कोवीड सेंटरला जशी मदत केली तशीच मदत नगरमधील अनेक बँकां- खासगी कंपन्यांनी देखील या कोवीड सेंटरला लाखो रुपयांची देणगी दिली. ही संपूर्ण रक्कम नीलेश लंके प्रतिष्ठानच्या बँक खात्यात जमा झाली. या कोवीड सेंटरला सरकारी खर्चाने डॉक्टर, नर्स देण्यात आल्या. येथे चहा- नाश्त्यासह जेवणासाठी अनेकांनी हात पुढे केला. मग, असे असताना प्रतिष्ठानच्या खात्यावर जमा झालेल्या कोट्यवधींच्या निधीचा हिशोब जनतेला अद्याप का देण्यात आला नाही असा सवाल औटी यांनी उपस्थित केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक: व्यापार्‍यांच्या जमीनीवर ताबेमारी, कुठे घडली घटना…

व्यापार्‍यांनी आमदार जगताप यांच्या नेतृत्वाखाली घेतली एसपींची भेट अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर तालुक्यात शहरातील व्यापार्‍यांच्या...

मार्केटींगसाठी ठेवलेल्या मुलीवर अत्याचार; पती-पत्नी आरोपी, कुठे घडला प्रकार पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री मार्केटींगचे काम करण्यासाठी ठेवलेल्या अल्पवयीन मुलीसोबत (वय १७) वारंवार शरीर संबंध...

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा मान नगरला; आमदार संग्राम जगताप म्हणाले…

नियोजनाची बैठक | महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांचा सत्कार अहिल्यानगर |...

धुक्यात नगर हरवले; नगर-सोलापूर रोडवर अपघात; मोठा अनर्थ टळला

  अहिल्यानगर | नगर सह्याद्री डिसेंबर महिन्यातील कडाक्याच्या थंडीचा अंमल संपून काही दिवस ढगाळ वातावरणाने नगर...