निघोज | नगर सह्याद्री
मळगंगा देवीचा मुख्य यात्रा उत्सव दि. १ मे पासून सुरू होत असला तरी देवीला हळद लावणे तसेच ८५ फूट काठीची मिरवणूक हे उस्तव मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहेत.
सोमवार दि.२२ रोजी देवीला हळद लावण्याचा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला असून मंगळवार दि.२३ रोजी देवीच्या काठीची मिरवणूक मोठ्या भक्तिभावाने संपन्न करण्यात आली. सजवलेली ही काठी ८५ फूट उंचीची असल्याने मोठ्या शिताफीने ही मिरवणूक मळगंगा देवीची हेमांडपंथी बारव या ठिकाणी साधारण पाच वाजता सजवली गेली.
त्यानंतर मळगंगा देवीच्या जयजयकार करीत ही काठीची मिरवणूक ग्रामपंचायत चौक ते मळगंगा मंदीर अशाप्रकारे वाजत गाजत आणली गेली. यावेळी हजारो भावीक या काठीला उचलण्याचा आनंद घेत होते. मळगंगा देवीच्या जयघोषाने आसमंत दणाणून गेला होता. देवीचा जयजयकार तसेच देवीची आराधना करीत हजारो भाविक तसेच ग्रामस्थ मिरवणुकीत सामील झाले होते.
यावेळी भंडार्याची उधळण मोठ्या प्रमाणात करण्यात आली. देवीच्या मंदीराच्या शिखराला काठी लागल्यानंतर अकरा दिवस हा यात्रेचा उस्तव सुरू असतो. यामध्ये शेतीच्या कामांना पुर्णपणे विश्रांती दिली जाते. ही पुर्वपरंपरा आजही जतन करण्यात येते. अकरा दिवस पशुहत्या बंद केली जाते या अकरा दिवसात घरोघर सवाष्णीचा कार्यक्रम संपन्न होत असतो.
या निमित्ताने देवीला पुरण पोळीचा नैवेद्य दाखवला जातो तसेच आसपासच्या महिलांना सवाष्णी साठी बोलवतात तसेच त्यांचा मानसन्मान,हळदी कुंकू लावीत त्यांनाही पुरण पोळीचा महाप्रसाद दिला जातो. शेकडो वर्षांपासून सुरू असलेली ही धार्मिक परंपरा मोठ्या भक्तिभावाने आजही सुरू आहे.