Lok Sabha Election 2024: महाराष्ट्रात लोकसभेचे वातावरण अतिशय विचित्र झालेले दिसत आहे. काही झाले तरी जिंकायचेच असेच ध्येय जणू डोळ्यासमोर ठेऊन अनेक पक्षातून उमेदवार दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहे. यात मात्र निष्ठावंतांची मोठी कोंडी झाली आहे. दरम्यान भाजपाला ऐन लोकसभापूर्वीचा पश्चिम महाराष्ट्रात मोठा धक्का बसला आहे. भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी अखेर भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून लवकरच ते तुतारी हाती घेत राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्रातील ४८ पैकी तब्बल २० जागेंवर उमेदवार हे दुसऱ्या पक्षातून आयात केलेले निश्चित करण्यात आले आहेत. माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केल्याने धैर्यशील मोहिते पाटील हे नाराज झाले होते. दरम्यान, गुरुवारी दि ११ एप्रिल रोजी धैर्यशील मोहिते पाटील यांनी पुण्यात शरद पवार यांची भेट घेतली.
भेटीनंतर आखेर नाराज धैर्यशील मोहिते पाटलांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यानंतर ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले होते. शरद पवार यांच्या भेटीनंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी गुरुवारी रात्रीच राजीनामा दिला असून लवकरच ते तुतारी हाती घेत राष्ट्रवादी काँग्रेस( शरद पवार ) गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.