spot_img
ब्रेकिंगगोळ्या झाडायच्या तर झाडा, पण मागे हटणा नाही!

गोळ्या झाडायच्या तर झाडा, पण मागे हटणा नाही!

spot_img

सुजय विखे यांच्या नवी मुंबईतील परिवार संवाद मेळाव्यास हजारोंची गर्दी | स्वागतासाठी कामोठ्यातील रस्त्यांवर तरुणाईसह महिला-माता भगिनी

अभिषेक शिर्के/दत्ता उनवणे
नवी मुंबई/कामोठे/पनवेल | नगर सह्याद्री

पारनेरमध्ये साडेचार वर्षात काय पिकलं हे कालच्या धमकीच्या क्लीपने आता स्पष्टपणे समोर आले आहे. अहिल्यानगरच्या जनतेसाठी, पारनेरच्या विकासासाठी तुमच्यापाठीमागे मी खंबीरपणे उभा आहे. पराभव स्पष्टपणे समोर दिसत असताना आणि त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच ते आता त्यांच्या कार्यकर्त्यांमार्फत माझ्यावर गोळ्या झाडण्याची भाषा बोलू लागले आहेत. माझ्यावर गोळ्या झाडायच्या असतील तर जरुर झाडा, पण आता मी माझ्या मतदारसंघात गुंडागर्दी खपवून घेणार नाही आणि जनतेच्या हितासाठी मागे हटणार नाही असा स्पष्ट निर्वाळा नगर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी जाहीर सभेत बोलताना दिला.

डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ पनवेल मधील कामोठे नगरी परिसरात परिवार संवाद सभेचे काल आयोजन करण्यात आले होते. यावेळी कामोठेकरांनी डॉ. सुजय विखे पाटील यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. हजारो नागरिकांच्या वतीने डॉ. सुजय पाटील यांची भव्य मिरवणूक काढत त्यांचा सन्मान करण्यात आला. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पारनेरकर, विजुभाऊ औटी मित्र परिवार व कोमोठे सांस्कृतिक युवा मंडळ आणि संदीप पाटील जनसेवा फाउंडेशन यांच्या वतीने परिवार संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून दक्षिण अहिल्यानगरचे विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या आगमनाने कामोठे नगरी दुमदुमली होती. सर्वत्र सुजय विखे यांच्या नावाचा जयघोष सुरू होता. मोठ्या थाटामाटात कामोठे पुलापासून ढोल ताशांच्या गजरात त्यांची मिरवणूक काढण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने पारनेरकर सहभागी झाले होते.

खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी यावेळी पारनेरकरांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आभार व्यक्त करत सदरची निवडणूक ही परिवर्तनाची असून दहशतवादी प्रवृत्ती संपवणारी आहे. यामुळे लोकांनी विचार करून मतदान करावे. विखे परिवार सदैव पारनेरकरांच्या पाठीशी आहे. मी केवळ विकासाच्या मुद्द्यावर मते मागणार असून येणार्‍या काळात फक्त विकासाचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी पारनेर, अहिल्यानगर, आणि नवी मुंबईतील सर्व भाजप आणि महायुती घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासह असंख्य नागरिक उपस्थित होते.

नगरकरांनो; कामोठ्यात येऊन पहा, पारनेरकरांना काय हवंय!
पारनेरची जनता यापुढे कोणत्याही दहशतीत राहणार नाही. साडेचार वर्षे दहशत तुम्ही सहन केली, ती दहशत यापुढे तुम्हाला कोणत्याही प्रकारे अडचणीत आणण्यासाठी राहणार नाही. तालुक्यातील प्रत्येकाच्या पाठीशी विखे पाटील परिवारा खंबीरपणे उभा राहत आलाय आणि राहील. संदीप वराळ कुटुंब हे त्याचे उदाहरण आहे. विकासाच्या आधारावर आपण जनतेसमोर मत मागायला चाललो आहोत. जनतेने ठरवले आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच होणार आहेत. जिल्ह्यातील जनतेने आजची येथील पारनेरकरांची उपस्थिती पहावी आणि त्यातून पारनेरकरांच्या मनात काय आहे हे समजून घ्यावे असे आवाहन यावेळी सुजय विखे पाटील यांनी केले.

बांदल साहेब तुम्ही तर अणुबाँब! तो शेवटी वापरणार!
तरुण मित्रांनो, तुम्ही तुमचं आयुष्य त्या व्यक्तीसाठी घालवलं. जेवढं विजू औटीने घालवलं त्याहीपेक्षा त्या व्यक्तीला मंगलदास बांदल जास्त ओळखतात. त्यामुळे ते बोलले तर मोठा भूकंप होईल. त्याची यशोगाथा सांगायला बांदल यांना एक तास लागेल. आता त्याच्या कृष्णकृत्यांची ती यशोगाथा माझा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सभेत बांदल सांगतील असे म्हणताच टाळ्या- शिट्ट्यांचा पाऊस पाडला. आपले प्रेम आशिर्वाद असेच राहू द्या अशी अपेक्षा व्यक्त करतानाच आपल्या प्रत्येकाच्या संरक्षणाची जबाबदारी घेतली असल्याचे सुजय विखे यांनी जाहीर करताच तरुणाईने सभास्थळ डोक्यावर घेतले आणि जयजयकाराच्या घोषणा दिल्या.

पनवेल-कामोठेकर विखेंच्याच पाठीशी ः आ. प्रशांत ठाकूर
पनवेल- कामोठ्यातील ही सभा ऐतिहासीक आहे. सभेची उपस्थिती पाहता या निवडणुकीमध्ये सुजय विखे पाटील तीन लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला. नगर मतदार संघाच्या आणि जनतेच्या अडचणी आपल्या असल्याचे समजून विखे पाटील कायम काम करत आला आहे. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित असल्याचे प्रतिपादन करतानाच पनवेल- कामोठे व मुंबईमधील पारनेरकरांनी विखे पाटलांच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहनही यावेळी आ. ठाकूर यांनी केले.

मुंबईकरांना कोरोनातील उपकार सांगायला लाज वाट नाही का?
कोरोना कालावधीत मुंबईकरांना गावात येऊ दिले जात नव्हते. त्यावेळी मी या मुंबईकरांना गावागावात प्रवेश देण्याचे काम केले असं आता हे महाशय सांगत आहेत. मात्र, त्याच मुंबईकरांमुळे तुम्ही आमदार झाला आणि त्यांनाच आपण उपकार केल्याचे सांगत असाल तर तुमच्या इतका कृतघ्न कोणीच नाही! हे सांगायला जराही लाज वाटू नये असा टोला माजी नगराध्यक्ष विजय औटी यांनी लगावताच उपस्थितांनी टाळ्यांचा पाऊस पाडला.

पारनेरकरांनो, दहशतीच्या विरोधात माझ्यासह ठाकूर परिवार तुमच्यासोबत!
दहशतीला घाबरु नका! अन्यायाच्या विरोधात बोला आणि लढा द्या! मुंबईमध्ये ठाकूर परिवार आणि त्यांचे काम सर्वश्रूत असल्याचे स्पष्ट करतानाच सुजय विखे म्हणाले, ‘ठाकुरसाहेब हा आमचा परिवार आहे, जो आम्ही तुमच्याकडे सुपूर्द केला आहे. कोणत्याही पारनेरकरांना कोणतीही अडचण आली तरी ठाकूर साहेब तुमच्या सोबत खंबीरपणे उभे राहणार. पारनेर भवन बाबत ठाकूर साहेबांशी बोललो असून त्याचा नारळ फोडायला मीच येणार असल्याचेही यावेळी विखे यांनी जाहीर केले.

शिव्यांची क्लीप ऐकताच अश्रू अनावर झालेल्या महिलांनी दिलं सुजय विखेंना लढण्याचं बळ!
सभेच्या ठिकाणी विजय औटी यांनी कळस येथील पंचायत समितीचा माजी सदस्य व नीलेश लंके यांच्या समर्थकाने सुजय विखे यांना गोळ्या घालण्याची दिलेली धमकी आणि ऑडीओ क्लीप व्यासपीठावर जनतेला ऐकवली. क्लीपमधील शिव्या आणि सुजय विखे यांना गोळ्या घालून मारण्याची भाषा ऐकताच उपस्थित महिला अवाक झाल्या! काहींनी तोंडात बोट घातली तर काहींनी मनस्ताप व्यक्त करत शिव्या देणार्‍याला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी केली. काही महिलांना या शिव्या आणि धमकी ऐकून अश्रू अनावर झाले. सभा संपल्यानंतर एका महिलेने सुजय विखे यांच्या जवळ येत दादा, घाबरुन जाऊ नका, हा …खाऊ आणि त्याची फौज तुमचं केस वाकडे करु शकत नाही, आम्ही त्याला नीट करू, असे बोलत लढण्याचं बळ दिलं.

पाथर्डीकरांकडून सुजय विखेंचा विशेष सन्मान
व्यवसाय- नोकरीच्या निमित्ताने पारनेरच्या जोडीने नगर जिल्ह्यातील पाथर्डीतील अनेक लोक पनवेल- कामोठ्यात राहत आहेत. मेळाव्याच्या निमित्ताने पारनेरकरांच्या जोडीने पाथर्डीतील नागरिक सहकुटुंब सहभागी झाले होते. या सर्वांनी मेळावा सुरु होण्याच्या आधी आणि मेळाव्यानंतर खा. सुजय विखे पाटील यांचा सत्कार केला आणि त्यांच्या सोबत सहकुटुंब सेल्फी काढल्या! पाथर्डीकरांना सर्वातोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी विखे पाटील यांनी त्यांना दिले.

गळक्या घराच्या जोडीने लोणावळा-अलिबागचे प्लॅटही सांगा!
सहानुभूती मिळवण्यासाठी तो त्याचे घर गळके असल्याचे सांगत आला आहे. वास्तव वेगळेच आहे. त्याचे आई वडिल जनतेला दाखविण्यासाठी त्या गळक्या घरात राहतात. हे महाशय ज्या घरात राहतात त्याला चार बाजूने एसी बसवलेले आहेत. स्वत: राहत नसलेलं गळकं घर सांगत असला तर मग जोडीने लोणावळा- अलिबागमधील प्लॅटची माहितीही सांगा. राजकारणासाठी आणि सहानुभूतीसाठी त्याने त्याच्या आई वडिलांच्या नावाचा वापर चालवला आहे. परमेश्वराकडे सार्‍या नोंदी आहेत. विजू औटींचा सहा महिने आधी राजीनामा घेणार्‍यांचाही सहा महिने आधी राजीनामा झाला असं प्रितेश पानमंद यांनी म्हणताच जनतेने टाळ्या- शिट्यांचा पाऊस पाडला.

भाऊ पावडे विखेंच्या व्यासपीठावर
निलेश लंके प्रतिष्ठानचे मुंबई अध्यक्ष भाऊ पावडे व त्यांचे सहकारी या मेळाव्याच्या निमित्ताने खा. सुजय विखे पाटील व विजूभाऊ औटी यांच्या समवेत व्यासपिठावर उपस्थित होते. पावडे यांच्या पुढाकारातून गेली चार-पाच वर्षांपासून निलेश लंके हे मुंबईतील संघटन चालवत होते. मात्र, आता तेच भाऊ पावडे हे विखे-औटी यांच्या व्यासपिठावर येवून त्यांनी सुजय विखे यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या.

सुप्याच्या एमआयडीसीतील भैय्यांचं कमिशन कोण खातं?
तालुक्यातील तरुणांना तालुक्यातच रोजगार मिळाला पाहिजे या हेतूने तत्कालीन आमदार नंदकुमार झावरे यांनी सुप्यात एमआयडीसी आणली. तत्कालीन खासदार बाळासाहेब विखे पाटील यांचेही त्यात मोठे योगदान! आज तेथे कोणाला रोजगार मिळाला आहे? तालुक्यातील तुमच्या सारखे तरुण मुंबईत पोट भरत आहेत आणि सुप्यात भैय्ये लोक पोट भरत आहेत. त्या भैय्यांना रोजगार देणार्‍या या महाशयांना त्यांच्याकडून कमिशन भेट असल्याचा आरोप यावेळी विजय औटी यांनी केला. भैय्यांचं कमीशन खाणार्‍यांंना आता कायमचं घरी बसवू अस आव्हान देखील यावेळी विजय औटी यांनी नामोल्लेख टाळत नीलेश लंके यांना दिले.

लंका दहन करण्यासाठी हनुमान होणार ः औटी
पारनेरमध्ये मोठ्या प्रमाणात भुरटेगिरी चालू असून ती थोपवावी लागणार आहे. संपर्क असल्याच्या वल्गना करणार्‍यांनी कोणाचे कितीवेळा फोन घेतले असे विचारताच उपस्थितांनी फोनच घेत नसल्याचे ओरडून सांगितले. तालुक्यातील या रावणाचा नाश करण्यासाठी मी हनुमान झालो असून दादा तुमच्यासाठी आणि तालुक्याच्या हितासाठी या रावणाची लंका आम्ही तरुण दहन केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास यावेळी विजय औटी यांनी व्यक्त करताच उपस्थितांनी हात वरुन त्यास प्रतिसाद दिला.

डोकं फोडून घेण्यासाठी त्यानेच माझ्या हातात दगड दिला ः प्रीतेश पानमंद
माझ्या सारख्या अनेकांची डोकी भडकावून देण्याचे काम साडेचार वर्षापूर्वी करण्यात आले. उद्धव ठाकरे यांच्या सभेत त्याने चाल खेळली आणि माझ्या हातात दगड देऊन मला माझ्या हाताने डोकं फोडून घ्यायला लावले. माझ्या डोक्यातून रक्त निघताच, त्यानेच आरडाओरड करत औटींच्या लोकांनी माझे डोकं फोडल्याची आवई उठवली. मीही त्याच्या नादी लागलेला. मित्रांनो, मला माफ करा! पण, हा खूपच लबाड आणि धूर्त कोल्हा आहे. आता त्याच्या नौटंकीला कोणीच बळी पडू नका! त्याने शिवसेनेला फसवलं आहे.

फाळकेंच्या समोर धमकावण्याच्या बैठका!
साळसुद वाटणारा हा सोंगाड्या कायम दहशत निर्माण करत आला आहे. त्याने जनतेला वेड्यात काढण्याचे आणि गृहीत धरण्याचे काम चालवलं आहे. त्यांच्याच पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्यासमोर मला धमकावले. फाळके यांच्या समोर अनेक तरुणांना धमया दिल्या गेल्यात आणि मी त्याचा साक्षीदार आहे.

तरुणांसह माता- भगिनींची उत्स्फूर्त गर्दी
सभेची वेळ सांयकाळी सातची होती. कामोठे येथील बुद्धविहार येथे यासाठी सुसज्ज मंडप उभारण्यात आला होता. मात्र हा मंडप सहा वाजताच गर्दीने भरला. विशेषत: माता- भगिनी आणि तरुणांची उत्स्फुर्त उपस्थिती लक्षणीय होती. विखे पाटलांसह विजू औटी यांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात तरुणांच्या जोडीने महिला देखील अग्रभागी होत्या. सुजय विखे पाटील यांची झांजपथकासह काढण्यात आलेली मिरवणूक लक्षवेधी ठरली.

विजय औटी नतमस्तक
व्यासपीठावर बोलण्यास उभे राहण्याआधी माजी नगराध्यक्ष विजय औटी यांनी व्यासपीठावर गुडघे टेकवत उपस्थित माता- भगिनी आणि पारनेरकरांना अभिवादन केले. औटी खाली बसून नतमस्तक होत असताना जनसुमदायातून त्यांच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी होत होती.

कोवीडची नौटंकी; वास्तव भयानक!
कोवीड कालावधीत काम केल्याची नौटंकी आहे. वास्तव वेगळेच आहे. त्यातील सारे खरे सांगायला लावू नका! ते समोर आलं तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही. दहा हजार रेमडीसेव्हीर इंजेक्शन दिल्याचे जे आज सांगत आहेत, त्यातील एक हजारापेक्षा जास्त इंजेक्शन त्याचे कोवीड सेंटरमध्ये सुजय विखे यांनी देखील दिल्याचे ते का सांगत नाहीत असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.

कामोठ्यात पारनेर भवन उभारण्याची मागणी
कामोठा- पनवेल परिसरातील पारनेरकरांना एकत्र येण्यासाठी व त्यांच्या कुटुंबातील वेगवेगळे कार्यक्रम होण्यासाठी कामोठ्यात पारनेर भवन उभारण्यात यावे अशी मागणी यावेळी कामोठेकरांनी खा. विखे पाटील यांच्याकडे केली. तीच मागणी विजय औटी यांनीही त्यांच्या भाषणातून केली. विखे पाटील यांनी त्यांच्या भाषणात या भवनचा नारळ आपण फोडण्यास येणार असल्याचे जाहीर करताच पारनेरकरांनी टाळ्या वाजवून त्यास प्रतिसाद दिला.

वेड्यात काढणार्‍याला आता त्याची जागा दाखवून देऊ!
मुंबईत यायचं आणि वेड्यात काढून निघून जाण्याचा धंदा गेल्या साडेचार वर्षात मांडला गेला होता. तो आता आमच्याही लक्षात आलाय! त्यामुळे त्या प्रतिष्ठानला सुरुंग लावण्याचे काम आम्ही सर्वांनी मिळून केले आहे. सत्तर टक्केपेक्षा जास्त जनता आपल्या सोबत आहे. आता त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही-
– कुडलिक वाफारे (युवा उद्योजक)

वेड्यात काढणार्‍याला आता त्याची जागा दाखवून देऊ!
मुंबईत यायचं आणि वेड्यात काढून निघून जाण्याचा धंदा गेल्या साडेचार वर्षात मांडला गेला होता. तो आता आमच्याही लक्षात आलाय! त्यामुळे त्या प्रतिष्ठानला सुरुंग लावण्याचे काम आम्ही सर्वांनी मिळून केले आहे. सत्तर टक्केपेक्षा जास्त जनता आपल्या सोबत आहे. आता त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही-
– कुडलिक वाफारे (युवा उद्योजक)

.कामोठे- पनवेलसह मुंबईकरांना वेड्यात काढून त्यांच्या मतांवर आमदारकी मिळवली. यानंतर त्यांच्यावरच गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यात बसून राहिलात. आता तुम्हालाही तुमची मुंबईतील लायकी दाखवून देण्यासाठी आम्ही संघटीत झालो आहोत. आमच्या अन्नात माती कालवण्याचे काम तुम्ही केले, त्याची किंमत तर तुम्हाला मोजावीच लागणार!
राहुल ठोकळ (वडापाव विक्रेता)

तुमच्या दबावातून माझ्या आईवर खोटा गुन्हा दाखल केला; आता माझ्या आईसारख्या अनेक माताभगिनी तुम्हाला जागा दाखवून देणार!
आम्ही मुंबईत कष्ट करतो. चोर्‍या करत नाही. त्यांच्यासाठी आम्ही मागील निवडणुकीत जीवाचे रान केले आणि त्यांनी आमच्यासह आमच्या आई व कुटुंबावर गुन्हे दाखल केल्याचे परतफेड केली. आता आम्ही त्यांच्या या कृत्याची परतफेड या लोकसभेच्या निवडणुकीत सव्याज करण्यास सज्ज झालो आहोत. माझ्या आईवर गुन्हा दाखल करण्यास तुम्ही पोलिस ठाण्यात बसून राहिलात, आता तुम्हाला कायमचं घरी बसविण्यासाठी माझ्या सारख्या हजारो तरुणांचे आई- वडिल मतदान केद्रात तुमच्या विरोधात असतील.
– शेखर काशिद (युवा उद्योजक)

‘कामोठ्याच्या जहागिरी’ची उपरोधिक घोषणा!
मेळाव्याच्या निमित्ताने मुंबईस्थित वेगवेगळ्या भागात राहणारे तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्याच्या सभास्थळाकडे येणार रस्ते पारनेरमय झालेले दिसून येत होते. यावेळी मेळाव्यास्थळी येणार्‍या महिलांच्या एका गटाकडून दिल्या जाणार्‍या घोषणा लक्षवेधी होत्या. कामोठा आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा’, कामोठ्याची जहागीरी, नाही तुमच्या बापाची’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...

मनपाचे दोन कर्मचारी निलंबित; कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महापालिकेच्या मार्केट विभागातील कथित हप्तेखोरीच्या समाजमाध्यमातून प्रसारित झालेल्या ध्वनिफितीसंदर्भात आयुक्त तथा...