मुंबई / नगर सह्याद्री –
राज्याच्या राजकारणात मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांची भाजपात घरवापसी होणार आहे. एकनाथ खडसे यांनी स्वत: याबाबत माहिती दिली आहे. “मी भाजपात प्रवेश करणार आहे”, असं एकनाथ खडसे म्हणाले आहेत. एकनाथ खडसे यांनी साडेतीन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. या दरम्यान त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधान परिषदेची आमदारकी देण्यात आली. ते सध्या विधान परिषदेचे आमदार आहेत. असं असताना त्यांनी आता परत भाजपात घरवापसी करण्याचा निर्णय घेतला आहे. एकनाथ खडसे यांच्या या निर्णयामुळे राज्यातील सत्तेची समीकरणं बदलतात का? ते आगामी काळात स्पष्ट होईल. पण एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशानंतर त्यांना पक्षाकडून मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशानंतर त्यांची राज्यपालपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. असं असलं तरी भाजपकडून किंवा एकनाथ खडसे यांच्याकडून राज्यपालपदाच्या जाबाबदारी बाबत अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.
महाराष्ट्रात 2014 च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचं सरकार स्थापन झालं होतं. त्यावेळी एकनाथ खडसे हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते. पण अचानक भाजपने धक्कातंत्राचा वापर करत भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केलं. त्यावेळी एकनाथ खडसे यांनी पहिल्यांदा बंड पुकारलं होतं. त्यांनी स्वत:ला घरात बंद करुन घेतलं होतं. त्यावेळी पहिल्यांदा खडसेंची नाराजी समोर आली होती. त्यांची नाराजी दूर करण्यात भाजप नेत्यांना तेव्हा यश आलं होतं. त्यावेळी खडसेंना महसूल मंत्रीपद मिळालं होतं. पण त्यानंतर लगेच काही दिवसांनी त्यांच्यावर जमीन घोटाळा प्रकरणी आरोप झाले. यामुळे खडसेंचं मंत्रीपद गेलं. त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर खडसेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
एकनाथ खडसेंना आपल्याच पक्षात घुसमट होत होती. विशेष म्हणजे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली. या निवडणुकीत रोहिणी खडसे यांचा पराभव झाला. तसेच जमीन घोटाळ्या प्रकरणी खडसेंचे जावई अनेक वर्ष जेलमध्ये होते. या सर्व गोष्टींमुळे अस्वस्थ झालेले खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्याआधी त्यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये आयोजित कार्यक्रमात आपली मनातील धुसफूस उघडपणे स्पष्ट केली होती. यामुळे भाजपात एकच खळबळ उडाली होती. खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशानंतर भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली होती. मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली होती. आता खडसे पुन्हा स्वगृही परतणार असल्याने आता गिरीश महाजन काय प्रतिक्रिया देतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
एकनाथ खडसे काय म्हणाले?
दरम्यान, एकनाथ खडसे यांनी आज प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आपल्या पक्षप्रवेशावर सविस्तर भूमिका मांडली. “भारतीय जनता पक्षात मी स्वगृही जाण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसात दिल्लीत माझा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. भाजप पक्षाच्या जडणघडणमध्ये माझं योगदान राहिलेलं आहे. गेले अनेक वर्ष मी या घरात राहिलेलो आहे. 40 ते 42 वर्ष या घरात राहिल्यानंतर स्वभाविकपणे या घराविषयी माझ्यामनात एक हळवी जागा आहे. पण काही कारणासाठी माझी नाराजी झाली. त्या नाराजीमुळे मी या पक्षातून बाहेर पडलो. आता माझ्या नाराजीची तीव्रता कमी झाली. त्यामुळे मी स्वत: माझ्या पक्षात परत येतोय”, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली.