शिर्डी | नगर सह्याद्री
शिर्डी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाने माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी दिली आहे. ही जागा काँग्रेस पक्षाला न मिळाल्याने नाराज झालेल्या काँग्रेसच्या युवा नेत्या व महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य उत्कर्षां रुपवते यांनी मुंबईत वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची राजगृहावर भेट घेतली. या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. रुपवते या तिसर्या आघाडीच्या संपर्कात असल्याने त्यांची बंडखोरी निश्चित मानली जात आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याशी थेट संपर्क असल्याने आपल्या नावाची घोषणा होईल, अशी रुपवते यांना खात्री होती; परंतु या मतदारसंघातून त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्या नाराज आहेत. उत्कर्षां रुपवते यांना, काँग्रेसचे निष्ठावंत माजी मंत्री स्व. दादासाहेब रुपवते व विधानसभेचे माजी सभापती स्व. मधुकरराव चौधरी यांची नात व वडील बहुजन शिक्षण संस्थेचे संस्थापक स्व. प्रेमानंद रुपवते असा मोठा राजकीय वारसा आहे.
त्यांना उमेदवारी नाकारल्याने शिर्डी लोकसभा मतदारसंघात त्यांचे समर्थक व काँग्रेसचे कार्यकर्ते संतापले आहेत. प्रेमानंद रुपवते यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी उत्कर्षां रुपवते यांनी गेल्या दोन वर्षांपासून शिर्डी लोकसभा मतदारसंघ पिंजून काढला आहे.